देशाच्या तुलनेत महाराष्ट्राचा गुन्हे दर कमी!

0
20201009_233957

मुंबई, दि. 9  ऑक्टोबर  :

देशाचा गुन्हे दर (Crime rate) वाढत असताना महाराष्ट्राचा गुन्हे दर मात्र 2018-19 च्या तुलनेत तोच राहिला असून महाराष्ट्र हे आठव्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रापेक्षा अधिक गुन्हे दर केरळ, तेलंगणा, मध्य प्रदेश, हरियाणा, राजस्थान या राज्यांचा आहे. तसेच राज्याचा गुन्हेगारांना शिक्षा होण्याचा दरही वाढला आहे. 2018 मध्ये हा दर 41.41 होता तो 2019 मध्ये 49 टक्के झाला असून महाराष्ट्र राज्याचा क्रमांक अकरावा आहे. यात कर्नाटक 36.6, मध्य प्रदेश 47.00, गुजरात 45.6, तेलंगणा 42.5 टक्के असा दर आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

खुनासंदर्भातील गुन्हे..

सन 2019 मध्ये देशात हिंसाचाराच्या एकूण 4.17 लाख गुन्ह्यांची नोंद झाली. तर राज्यात 2019 मध्ये हिंसाचाराचा गुन्हे दर केवळ 36 होता आणि राज्य 11 व्या क्रमांकावर होते. सन 2019 मध्ये देशाचा खुनासंदर्भातील गुन्ह्यांमध्ये गुन्हे दर 2.2 असा होता. त्यात महाराष्ट्राचा गुन्हे दर केवळ 1.7 असून महाराष्ट्र राज्य हे 25 व्या क्रमांकावर होते. तर खुनाचा प्रयत्न संदर्भातील गुन्ह्यांबाबत महाराष्ट्राचा 17वा क्रमांक आहे.

संपूर्ण देशात 2019 मध्ये भा.दं.वि.चे 32.25 लाख गुन्हे नोंदविले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राचा गुन्हेदर 278.4 असून महाराष्ट्र राज्य 8व्या क्रमांकावर (प्रतिलाख लोकसंख्येनुसार) आहे. यात मध्य प्रदेश, हरियाणा, केरळ, राजस्थान, तेलंगणा यांचा दर जास्त आहे तर उत्तर प्रदेश हे राज्य भा.दं.वि.च्या गुन्ह्यांमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. आर्म्स ॲक्ट अंतर्गत अवैध हत्यार बाळगण्याच्या प्रकरणात महाराष्ट्राचा 9 वा क्रमांक आहे. एकूणच ही आकडेवारी पाहता महाराष्ट्र राज्य गुन्हेगारी रोखण्यामध्ये निश्चितच यशस्वी झाले आहे, असे अनिल देशमुख यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *