Ads

-

डॉ. पद्मसिंह पाटलांसह सर्वजण निर्दोष मुक्त..

By Xtralarge News

June 20, 2026 5:08 pm

Ads

डॉ. पद्मसिंह पाटलांसह सर्वजण निर्दोष मुक्त..

मुंबई, दि. २० जून २६..

पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात विशेष सीबीआय न्यायालयाने माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले. या निकालामुळे खासदार ओमराजे निंबाळकर यांना मोठा धक्का बसला आहे. २० वर्ष चाललेल्या न्यायालयीन लढाई नंतरही कोणालाही शिक्षा झाली नाही. न्यायालयाने तपासातील गंभीर त्रुटी आणि अपुऱ्या पुराव्यांमुळे सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

पवनराजे निंबाळकर व पद्मसिंह पाटील यांच्यातील राजकीय वादातून ही हत्या करण्यात आली होती. पवनराजे निंबाळकर ३ जून २००६ या दिवशी मुंबईहून पुण्याच्या दिशेने जात असताना नवी मुंबईच्या कळंबोलीत एक्सप्रेस हायवेवर पवनराजे निंबाळकर यांची कार अडवून त्यांची हत्या करण्यात आली होती. या हल्ल्यात त्यांचा चालक समद काझी याचाही मृत्यू झाला होता.या प्रकरणात 25 लाखांची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचा आरोप माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर होता. मात्र, तब्बल 20 वर्षांच्या प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर सीबीआय कोर्टाने सर्व 8 आरोपींची निर्दोष सुटका केली.

या निकालावर प्रतिक्रिया देताना खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले की, यापेक्षा दुर्दैव ते काय, मला वाटतं न्यायव्यवस्थेचं यापेक्षा मोठं दुर्दैव असू शकत नाही. या खटल्याच्या निकालासाठी 20 वर्षांचा मोठा कालावधी घेतला गेला, त्यानंतर असा निर्णय येत असेल तर हे दुर्दैवी आहे. कोर्टाने राजकीय वैमनस्य होतं, हे मान्य केले आहे, तरीही सर्वच आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.त्यामुळे, कोर्टाच्या निकालाचे पूर्ण वाचन करुन आणि सीबीआय काय निर्णय घेते, हे पाहावे लागेल, असे ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले.

कोर्टाच्या निकालानंतर डॉ. पद्मसिंह पाटील यांचे वकिल अॅड. भूषण महाडिक म्हणाले की, हे सर्व प्रकरण तथाकथित आहे, या गुन्ह्यातील सर्व सूत्रधार बाजूला ठेवून राजकीयदृष्ट्या खोटा खटला त्रास देण्यासाठी दाखल केला. याप्रकरणातील माफीचा साक्षीदार पारसमल जैन यांच्या साक्षीने प्रकरण गृहित धरता येत नाही. कंळबोली पोलिसांनी याप्रकरणात दीड वर्षे तपास केला, मयताच्या नातेवाईकांच्या सांगण्यावरून तपास केला, पद्मसिंह पाटील कॅबिनेट मंत्री असताना त्यांना बदनाम करण्यासाठी हे सर्व केले, असेही वकील भूषण महाडिक यांनी म्हटले.

No comments to show.

Leave a Comment