अर्नब गोस्वामींना अटक कधी करणार?
मुंबई, दि. 8 ऑक्टोबर:
मुंबई पोलिसांनी मोठा टीआरपी घोटाळा उघड करून अर्नब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीचेही पितळ उघडे पाडले आहे. या प्रकरणी दोन टीव्ही चॅनलच्या मालकांना अटकही करण्यात आली आहे. पैसे देऊन टीआरपी वाढवले जात होते असं मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी सांगितले आहे.
मुंबई पोलिसांच्या कारवाईमुळे पत्रकार अर्नब गोस्वामी चांगलेच अडचणीत आले असून त्यांना अटक करण्याची मागणी केली जात आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी अर्नब यांना अटक करण्याची मागणी केली आहे.
सरनाईक म्हणतात,’फक्त मराठी’ आणि ‘बॉक्स टीव्ही’ च्या चालकांप्रमाणेच लोकांना पैसे देऊन बनावट टीआरपी वाढवण्याऱ्या रिपब्लिक चॅनेलच्या अर्णब गोस्वामी यांनाही लवकरात लवकर अटक करावी. आपल्या चॅनेलला मोठे करण्यासाठी पैसे ओतून टीआरपी घोटाळा करणे हा खूप मोठा गुन्हा आहे. त्यामुळे जसे दोन चॅनेल्सच्या मालकांना अटक केली तशीच अर्णब गोस्वामी यांनाही अटक व्हायला हवी, ही माझ्यासह सर्वांचीच मागणी आहे. अर्णब गोस्वामी इतके कोण मोठे आहेत की ज्यांना अटक केली जात नाही, असा प्रश्नही लोकांच्या मनात पडला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी त्यांना तातडीने अटक करावी म्हणजे जे सत्य आहे ते समोर येईल.
‘पूछता है भारत, अर्णब गोस्वामी यांना आपण कधी अटक करणार?’, असा सवालही सरनाईक यांनी केला आहे.
