कृषी-कामगार कायद्यावर सीएमसोबत चर्चा करू!

0
IMG_20200808_164355

केंद्र सरकारचे काळे कायदे शेतकरी-कामगारांवर अन्याय.

मुंबई, दि. ८ ऑक्टोबर २०२०:
केंद्र सरकारने आणलेले शेतकरी व कामगार कायदे हे देशातील शेतकरी व कामगारांना वेठबिगार बनवणारे आहेत. हे काळे कायदे शेतकरी व कामगारांना पूर्णपणे उद्धवस्त करणारे त्यांच्यावर अन्याय करणारे असून फक्त उद्योगपतींच्याच फायद्याचे आहेत, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
बाळासाहेब थोरात यांनी आज मुंबईतील गांधी भवन येथे राज्यातील विविध कामगार संघटनांच्या प्रतिनिधींशी यासंदर्भात चर्चा केली.
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना थोरात म्हणाले की, भाजपा सरकारने संसदीय नियम व लोकशाहीला पायदळी तुडवून लोकसभा व राज्यसभेत कृषी कायदे व कामगार कायदे मंजूर केले. हे दोन्ही कायदे कामगार व शेतकऱ्यांवर अन्याय करणारे आहेत. त्यामुळेच आज विविध कामगार संघटनांच्या प्रतिनिधींसोबत या संदर्भात चर्चा केली. कामगार कायद्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. मुंबई हे कामगार चळवळीचे महत्त्वाचे केंद्र आहे. कामगारांना महत्वाचे स्थान हे सहजासहजी मिळाले नाही त्यासाठी खूप प्रयत्न, संघर्ष करावे लागले आहेत. कामगारांना कायद्याचे संरक्षण देण्याचे काम सुरुवातीला महाराष्ट्रातच झाले. काँग्रेस पक्ष व महाराष्ट्र विकास आघाडी सरकार कामागारांसोबत असून त्यांना संरक्षण देण्याचा आमचा प्रयत्न राहील. कामगार व शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेस पक्ष या काळ्या कायद्याविरोधात संघर्ष करत राहिल, असेही थोरात म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *