Ads

--

अखेर सिद्धरामय्यांचा CM पदाचा राजीनामा.

By Xtralarge News

May 28, 2026 1:14 pm

Ads

अखेर सिद्धरामय्यांचा CM पदाचा राजीनामा..

बंगलुरु, दि. २८ मे २०२६..

कर्नाटकात काँग्रेसने नेतृव बदल करण्याचा निर्णय घेतल्यानंतर  सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. गुरुवारी त्यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसोबत नाश्ता केला आणि त्यानंतर राजीनामा देत असल्याचा निर्णय जाहीर केला. पक्षाच्या ‘हाय कमांड’ने सांगितल्यामुळे आपण राजीनामा देत असल्याचे सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले.

सिद्धरामय्या यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा करण्यापूर्वी, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे देखील नाश्त्यासाठी त्यांच्या निवासस्थानी आले होते. त्यांनी सिद्धरामय्या यांचे आशीर्वादही घेतले. कर्नाटकात २.५-२.५ वर्षे मुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णय झाला होता त्यानुसार शेवटी सिद्धरामय्या यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले व त्यांनी तो दिला आहे. सिद्धरामय्या यांना राष्ट्रीय राजकारणात भूमिका निभावण्यासही पक्षश्रेष्ठींनी सांगितले आहे. सिद्धरामय्या यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यामुळे आता डी. के. शिवकुमार यांचा मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सिद्धरामय्या यांनी कर्नाटकाचे दोनदा उपमुख्यमंत्रीपद, दोनदा मुख्यमंत्रीपद आणि नऊ वेळा विधानसभेचे आमदार म्हणून कार्यभार सांभाळला आहे. सिद्धरामय्या १९८३ मध्ये, चामुंडेश्वरी मतदारसंघातून पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले. १९८५ मध्ये, वयाच्या ३८ व्या वर्षी, जनता पक्षाच्या सरकार मध्ये सिद्धरामय्या पहिल्यांदाच रेशीम उद्योग मंत्री बनले. १९९६ मध्ये, जे.एच.पटेल यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. २००४ मध्ये, जेडीएस (JDS) आघाडी सरकारचा एक भाग म्हणून, सिद्धरामय्या दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झाले.

२००५ मध्ये  एच. डी. देवेगौडा आणि सिद्धरामय्या यांच्यात मतभेद झाले व त्यानंतर त्यांना JD(S) मधून बाहेर काढण्यात आले. २००६ मध्ये, सिद्धरामय्या यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, २००९ ते २०१३ या काळात कर्नाटक विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिले. २०१३ मध्ये काँग्रेस सरकारची स्थापना झाल्यानंतर, सिद्धरामय्या यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली. २०२३ मध्ये पुन्हा काँग्रेस सरकार स्थापन झाल्यानंतर सिद्धरामय्या यांची दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली.

सिद्धरामय्या हे चामुंडेश्वरी मतदारसंघातून पाच वेळा, वरुणा मतदारसंघातून दोन वेळा आणि बदामी मतदार संघातून एकदा आमदार म्हणून निवडून आले होते. काँग्रेसने आगामी २०२८ ची विधानसभा निवडणूक व २०२९ ची लोकसभा निवडणुक लक्षात ठेवून हा नेतृत्व बदल केल्याचे समजते.

No comments to show.

Leave a Comment