कर्नाटकात काँग्रेस पक्ष भाकरी फिरवणार !
बंगळूरु, दि. २७ मे २०२६..
कर्नाटक एका मोठ्या राजकीय स्थित्यंतराच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसत असून राज्यात नेतृत्वबदलासाठी काँग्रेसच्या हाय कमांडने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना निर्देश दिल्याचे समजते. मंगळवारी दिल्लीत झालेल्या एका महत्वाच्या बैठकीत मुख्यमंत्री पद सोडण्याचे निर्देश दिल्याचे खात्रीलायक सुत्रांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी. के. सी. वेणुगोपाल व कर्नाटकातील महत्वाच्या नेत्यांची सहा तास बैठक झाली. याबैठकीतच सिद्धरामय्या यांनी आता राजीनामा देऊन दिल्लीत यावे असे सांगण्यात आल्याचे समजते. सिद्धरामय्या आता ७८ वर्षांचे असून आगामी निवडणुकीसाठी नव्या दमदार चेहऱ्याची काँग्रेसला आवश्यकता आहे.
दिल्लीतील बैठकीनंतर राज्यसभा निवडणुकीच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे के. सी. वेणुगोपाल यांनी प्रसार माध्यमांशी सांगितले असले तरी त्यासाठी ६ तास बैठकीची गरज काय होती असा प्रश्न उपस्थित होतो. दिल्लीतील बैठकीनंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी सकाळी आपल्या बंगळुरूच्या निवासस्थानी सकाळी नाश्त्यासाठी एक बैठक बोलावली होती.
सिद्धरामय्या हे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यसभा खासदार होतील व दिल्लीत महत्वाची जबाबदारी दिली जाईल असे समजते. तर मुलाला मंत्रीपद दिले जाऊ शकते. दुसरीकडे काँग्रेसचे संकट मोचक डी. के. शिवकुमार यांची मुख्यमंत्री पदी वर्णी लागेल असे समजते.
डी. के. शिवकुमार यांनी कठीण काळात पक्षाची साथ कधीच सोडली नाही. सत्तेच्या लालसेपोटी अनेक नेते शांत बसले किंवा त्यांनी आपली निष्ठा बदलली असताना, डी के. शिवकुमार मात्र काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. राजकीय संकटांच्या काळात आमदारांचे संरक्षण करण्यापासून ते कर्नाटकात काँग्रेसची संघटना पुन्हा उभारण्यापर्यंत—डीकेएस यांनी एका पूर्णवेळ सैनिकाप्रमाणे काम केले. कर्नाटकात काँग्रेसला पुन्हा सत्तेवर आणण्यात त्यांचे योगदान मोठे आहे, त्यांना जेलमध्ये जावे लागले तरी त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला नाही व कर्नाटकात डी के एस सारखा एक कणखर ऊर्जावान व निष्ठावान नेता काँग्रेसला हवा आहे..
Leave a Comment