‘दिशा’ कायदा येत्या अधिवेशनात संमत करू!
मुंबई, दि.७ ऑक्टोबर :
राज्यातील माता भगिनींसाठी सुरक्षेचे मोठे कवच निर्माण करणारा ‘दिशा’ कायदा येत्या अधिवेशनात संमत करून घेणार, अशी ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित ‘दिशा’ कायदा अंमलबजावणी तसेच महिला व अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रतिबंध करण्यासाठी करावयाच्या उपाय योजना यासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
दिशा कायद्यासंदर्भात महिलांसाठी मोठे सुरक्षा कवच निर्माण करण्यात येत असून यासंदर्भातील मसूदा अंतिम झाला आहे. याबाबत माता-भगिनी तसेच तज्ज्ञांकडून अधिक सूचना देऊन त्याचाही अंतर्भाव यात करण्याबाबतची कार्यवाही तातडीने पूर्ण करून हा कायदा येत्या अधिवेशनात संमत करून घेतला जाईल, असे देशमुख यांनी सांगितले. या बैठकीत सर्व प्रकारच्या चांगल्या सूचना आलेल्या आहेत त्याची नोंद घेवून हा कायदा अधिक चांगल्या पद्धतीने कसा करता येईल याचा विचार शासन करत आहे असे गृहमंत्र्यांनी सांगितले.
स्काईपद्वारे या बैठकीत सहभाग नोंदवत विधान परिषद उपसभापती श्रीमती नीलम गोऱ्हे तसेच चारूलता टोकस यांनी आपल्या सूचना मांडल्या. उपस्थित महिला प्रतिनिधीनींही सहभाग घेवून महत्त्वाच्या बाबी अधोरेखित केल्या. त्यात प्रामुख्याने महिला पोलिसांची संख्या वाढविणे, महिलांविषयक कायदे व सुविधा यांची अधिकाधिक प्रसिद्धी करणे, महिला आयोग अध्यक्ष व इतर सदस्यांच्या नियुक्त्या करणे या सूचना करण्यात आल्या.
