मोदी म्हणजे, लोकां सांगे ब्रम्हज्ञान स्वत: कोरडे पाषाण …
मुंबई, दि. १३ मे २०२६.
राज्यातील सत्ताधारी पक्षातील मंत्री आणि आमदार सुरक्षेच्या नावाखाली मोठमोठे ताफे घेऊन फिरत आहेत. सरकारी व्यवस्थेची आणि जनतेच्या पैशांची मोठ्या प्रमाणावर उधळपट्टी सुरू आहे. स्वतःच्याच हाताने स्वतःची पाठ थोपटण्याचे काम भाजप सरकारने केले असून देशाला त्याग करण्याचे नरेंद्र मोदींचे आवाहन म्हणजे, ‘लोकां सांगे ब्रम्हज्ञान स्वत: कोरडे पाषाण, असे आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, भाजप सरकारमधील मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि स्वतः पंतप्रधान कसे वागतात याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. माजी केंद्रीय मंत्री मधू दंडवते यांनी अशाच कठीण परिस्थितीत स्वतःपासून काटकसरीची सुरुवात केली होती. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि लालबहादूर शास्त्री यांनीही स्वतः उदाहरण घालून दिले होते. तत्कालीन परिस्थितीत देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण नव्हता, माजी पंतप्रधान इंदिराजी गांधी यांनी हरितक्रांती आणि श्वेतक्रांती घडवून आणत देशाला स्वयंपूर्ण बनवले.
राहुलजी गांधी यांनी याबाबत अनेकदा भूमिका मांडली आहे. मी स्वतः यासंदर्भात पत्रव्यवहार केला असून, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही यावर टीका केली आहे. याचा अर्थ देशाची परिस्थिती धोकादायक बनत चालली आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत असुरक्षित होत चालला असून, सामान्य जनतेसमोर अन्नधान्य आणि दैनंदिन गरजांबाबत गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. देशावर संकट आलेल्या काळात काँग्रेसने नेहमी सर्वपक्षीय भूमिका घेतली. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनाही परदेश दौऱ्यावर प्रतिनिधित्वाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, आज देशाचे पंतप्रधान सर्वपक्षीय बैठकींना अनुपस्थित राहतात. त्यामुळे शरद पवार यांनी दिलेला सल्ला योग्य असल्याचे स्पष्ट होते असेही नाना पटोले म्हणाले.
Leave a Comment