NEET ची परीक्षा रद्द, पुन्हा पेपर द्यावा लागणार..
मुंबई, दि. १२ मे २०२६..
मेडीकलसाठी आवश्यक असलेली ३ मे रोजी झालेली (NEET) नीट परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे. या परिक्षेचा पेपर लिक झाल्याचे उघड झाल्याने ही परिक्षाच रद्द करण्यात आली आहे. देशभरातील २२ लाख विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे. ही परिक्षा पुन्हा घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
नीट पेपरफुटीचे नाशिक कनेक्शन उघड झाले असून नाशिकमधून (Nashik) नीट परीक्षेचा पहिला पेपर फुटला, येथून पहिली प्रश्नपत्रिका बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात संशयित शुभम खैरनार याला अटक करण्यात आली आहे. तर मनिष हा मास्टरमाईंड राजस्थानचा आहे. राजस्थान सीबीआय आणि पोलिसांनी दिलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नाशिक गुन्हे शाखा युनिट दोनने ही कारवाई केली. शुभम खैरनार बी.ए.एम.एस. (BAMS) च्या शेवटच्या वर्षात शिकत होता. एक मे रोजीच हा पेपर फुटला होता, शुभम खैरनारने १० लाख रुपयांना ही प्रश्नपत्रिका विकत घेतली आणि ती १५ लाख रुपयांना विकल्याचे समजते.
नीटच्या प्रश्नपत्रिकेची पहिली कॉपी नाशिकध्ये लीक झाली तिथून ती हरियाणात पोहोचली. हरियाणात या पेपरचे १० संच तयार करण्यात आले आणि त्यानंतर बिहार, आंध्र प्रदेश, जम्मू-काश्मीरपर्यंत ही साखळी पसरली. या प्रकरणात आतापर्यंत देशभरातून १६ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) 3 मे रोजी झालेली परीक्षा रद्द केली असून नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र तेच राहणार असून त्यांना नवीन हॉल तिकीट दिले जाईल.
Leave a Comment