S.T. ला वेतनवाढ फरकाची रक्कम देण्यास टोलवाटोलवी !
मुंबई, दि. ७ मे ..
एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना वेतनवाढ फरकाची रक्कम देण्यासाठी राज्य सरकारकडून निधी देण्याची घोषणा मध्यंतरी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. पण डिसेंबर पासूनचा पाच महिन्यापासूनचा कालावधी उलटून गेला तरी निधी अर्थ खात्याकडून एसटीला मिळाला नसून ही घोषणा अद्यापही हवेतच, राहिली असल्याची टीका महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन देण्यासाठी दर महिन्याला सरासरी ४७४ कोटी रुपये इतकी रक्कम लागत असून त्यात वेतनवाढ फरकाच्या हप्त्याची ५८ कोटी ३० लाख रुपये इतकी रक्कम वाढवली तर वेतनाला एकूण सरासरी ५३४ कोटी रुपये इतकी रक्कम लागत असून सरकारकडून या महिन्यात फक्त ४१६ कोटी ६६ लाख रुपये रुपये इतकी रक्कम देण्यात आली आहे. या महिन्यात सुद्धा वेतनवाढ फरकाची रक्कम देण्यासाठी एसटीला निधी मिळाला नसून त्यामुळे या महिन्यातही एसटीला आपल्या तिजोरीतूनच वेतनवाढ फरकाची रक्कम द्यावी लागणार आहे.
ही बाब अगोदरच आर्थिक विवंचनेत सापडलेल्या एसटीच्या चिंतेत भर घालणारी असून डिसेंबर २५ पासून २९१ कोटी ५० लाख रुपये इतका पाच महिन्यांचा थकीत निधी दर महिन्याला मागणी करूनही सरकार कडून देण्यात आला नसून अजूनही टोलवा टोलवी सुरूआहे. सरकारची ही घोषणा म्हणजे “घरी नाही दाणा आणि मला बाजीराव म्हणा” या म्हणी सारखी असल्याचा टोलाही बरगे यांनी लगावला आहे.
वैधानिक देणी ५००० कोटींवर!
मागणी प्रमाणे सरकार कडून निधी मिळाला नसल्याचे ५००० कोटी रुपयांची वैधानिक देणी रक्कम थकीत असून आता या महिन्यातही पी. एफ., ग्राजुटी, एसटी बँक, पुरवठादार यांची देणी प्रलंबित राहणार आहेत. यातील बहुतांशी संस्था व्याजावर चालत असल्याने व गेली अनेक महिने गुंतवणूक रक्कमेवर व्याज मिळत नसल्याने पुढेही परिस्थिती अशीच राहिली तर या संस्था मोडकळीस आल्या शिवाय राहणार नाहीत असेही बरगे यांनी म्हटले आहे…
Leave a Comment