पंढरपूर तीर्थक्षेत्रासाठी ₹ ४१५० कोटींचा आराखडा मंजूर.
मुंबई, दि. ५ मे ..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासंदर्भात शिखर समितीची बैठक मंत्रालयात पार पडली. या बैठकीत ₹4150.46 कोटीच्या सर्वसमावेशक आराखड्यास मान्यता देण्यात आली. पंढरपूर हे राज्यातील सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या भाविकास आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, पुढील 50 वर्षाचा विचार करून या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी करण्यात येणारी विकासकामे येत्या 30 महिन्यात पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंढरपूर हे राज्यातील महत्त्वाचे धार्मिक व सांस्कृतिक तीर्थक्षेत्र आहे. येथे दरवर्षी आषाढी, कार्तिकी, चैत्री आणि माघी वारीच्या काळात लाखो वारकरी श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या दर्शनासाठी येतात. भाविकांची सातत्याने वाढणारी संख्या, रस्ते, वाहतूक आणि अन्य संबंधित बाबी लक्षात घेता पंढरपूर तीर्थक्षेत्र परिसराच्या समग्र व नियोजित विकासाची कामे वेगाने हाती घेण्यात यावीत.
पंढरपूर येथे येणाऱ्या वारकरी व भाविकांना स्वच्छ, गर्दीमुक्त, सुरक्षित आणि आध्यात्मिकदृष्ट्या समाधानकारक अनुभव मिळावा, हा विचार करून दर्जेदार विकासकामे, शाश्वत व भविष्याभिमुख पायाभूत सुविधा उभारणे आवश्यक आहे. यासाठी बाधित निवासी व व्यावसायिक मालमत्ताधारक तसेच भाडेकरूंना योग्य मोबदला तात्काळ देण्यात यावा. भूसंपादनासाठी आवश्यक निधीही त्वरित उपलब्ध करून द्यावा, अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गणेश नाईक, मंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Leave a Comment