Mumbai CP 3

मुंबई, दि. ७ ऑक्टोबर:

भारतीय जनता पक्षाचा सोशल मीडियाच्या माध्यमातून नवा दहशतवाद फोफावला असून भाडोत्री आयटी सेलच्या माध्यमातून रातोरात ट्विटर, फेसबुकवर अकाऊंट उघडून बदनामी वा अपप्रचाराची मोहिम राबवण्याचे उपद्व्याप सुरु आहेत. हा नवा दहशतवाद लोकशाही विरोधात रचलेला कटच आहे. या नव दहशतवादाचे समुळ उच्चाटन झाले पाहिजे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

सचिन सावंत यांच्या नेतत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज मुंबई पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांची भेट घेतली. महाराष्ट्राच्या बदनामी मोहिमेचा टविटरवरुन मिळालेला डेटा पुढील तपासासाठी पोलिसांकडे देण्यात आला आहे. पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये या कंपन्यांची नावं, सोशल मीडियावरील खऱे व फेक अकाऊंटसची माहिती आहे. याची चौकशी करु, असे आश्वासन पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांनी दिले आहे, असे सावंत म्हणाले.

यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, भाजपाने सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधकांची बदनामी करण्याची, त्यांची प्रतिमा मलीन करण्याची मोहीम पद्धतशीरपणे चालवण्याचा नवा ट्रेंड आणला असून हा नव दहशतवाद आहे. याच माध्यमातून रातोरात हजारो ट्विटर, फेसबुक अकाऊंट उघडून बदनामीची मोहीम राबवली जाते. सुशांतसिंग राजपूत प्रकरणातही याच रॅकेटचा वापर करण्यात आला आहे. या ट्विटची वर्तनात्मक पद्धत, इतिहास, त्यांचे ट्विट व रिट्विट पाहिल्यास असे दिसते की महाराष्ट्र सरकार विरोधात विचारपूर्वक व नियोजित कट कारस्थान आहे.

या ट्विटच्या असामान्य पॅटर्ननुसार फेसबुक, ट्विटरचा कोणताही सामान्य वापरकर्ता 3 महिन्यांत 40 हजार ट्वीट/पोस्ट करू शकत नाही. यातील बहुतांश ट्विटर हँडलने दर मिनिटाला २५ ट्विट्स केल्याचे दिसते. हे सर्व ट्विट साधारणपणे एकाच विषयाच्या संदर्भात करण्यात आलेत ते म्हणजे सुशांतसिंग राजपूत (SSR). त्यांचे हॅशटॅगही कॉमन आहेत.

पालघरमधील दोन साधूंच्या हत्यावेळी, दिल्ली दंगलीतही हीच मोडस ऑपरेंडी वापरण्यात आली होती आणि  भविष्यातही अशाच पद्धतीने हे उपद्व्याप करुन समाजात अशांत पसरवली जाऊ शकते, तसेच विरोधी पक्षांची सरकारे अस्थिर करण्यासाठी वापर केला जाऊ शकतो. अशी भीती सावंत यांनी व्यक्त केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *