अशोक खरातच्या कारनाम्यांशी संबंध नाही.
मुंबई, दि. १५ एप्रिल..
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात चुकीचा पायंडा पाडला जात आहे. केवळ तर्कवितर्क, अंदाज, सुरस कथा आणि रंजक अफवा यांच्या आधारावर मला व माझ्या परिवाराला मानसिक त्रास दिला जातोय,बदनाम केले जात आहे, मी पहिल्या दिवसापासून माझी ठाम आणि स्पष्टपणाने भूमिका मांडत आले आहे. खरात प्रकरणात कोणत्याही आर्थिक व्यवहारात, जमीन व्यवहारात व इतर कोणत्याही दुष्कृत्यात दुरान्वये संबंध नाही असे रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले आहे.
खरात प्रकरणावर आपली बाजू मांडत रुपाली चाकणकर म्हणतात की, महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात आजतागायत अनेकांवर आरोप झाले,त्या आरोपांचे पुरावे माध्यमांनी सबंध महाराष्ट्राला दाखवले व आरोप करणाऱ्यांनीही पुराव्यानिशी आरोप केले. मात्र 28 दिवस होत आहेत, माझ्यावर व माझ्या परिवारावर बेछूट व कपोलकल्पित आरोप हे फक्त हेतूपुरस्सर व बदनाम करण्यासाठी होत आहेत, हे वेळोवेळी समोर येत आहे. याबाबतीत आरोप करणाऱ्यांनी ना पुरावे दिले ना प्रसार माध्यमांनी ते मागितले.
निनावी पत्राबाबत जे कोणी आरोप करणारे आहेत त्यांनी सांगावे की ते पत्र त्यांच्यापर्यंत कसे आले? कोणतीही शहानिशा न करता केवळ आणि केवळ बदनामीचा कुटील डाव साध्य करण्यासाठी, पोलीस प्रशासनाला प्राप्त झालेलं एक निनावी पत्र माध्यमांकडे सुपूर्त करून दिवसभर चर्चासत्र घडवून आणले गेले,हे घडवून आणण्यामागे कुणाचे “सौजन्य“ होते हे समोर आले पाहिजे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनीही ज्या पत्रावर नाव व पत्ता नाही अशा निनावी पत्राला कायदेशीरदृष्ट्या काहीही अर्थ नसल्याने महत्त्व देता येत नाही, हे माध्यमांसमोर येत स्पष्ट केले आहे. तरीही, खोडसाळपणा करण्यासाठी हे पत्र कोणी लिहिले,कोठून आले याची चौकशी झालीच पाहिजे.
प्रसार माध्यमांमधून माझ्याविरोधी एकतर्फी येणाऱ्या बातम्यावर मी प्रतिक्रिया किंवा कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही कारण SIT व चौकशी करत असलेल्या तपास यंत्रणेला निष्पक्षपणे चौकशी करता यावी हाच हेतू आहे असेही रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.
Leave a Comment