Ads

-

उद्योजक होताना टाटांचा आदर्श ठेवा..

By Xtralarge News

March 22, 2026 9:56 pm

Ads

उद्योजक होताना टाटांचा आदर्श ठेवा..

मुंबई दि. २२ मार्च :

आजच्या काळात विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळवणे पुरेसे नाही, तर ती पदवी रोजगारात रूपांतरित होणे आवश्यक आहे. आजच्या काळात तांत्रिक ज्ञानासोबतच सॉफ्ट स्किल्स आणि बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची क्षमता असणे ही यशाची गुरुकिल्ली मानली जाते. उद्योजक बनू इच्छिणाऱ्या तरुणांनी रतन टाटा यांचा आदर्श ठेवावा असे प्रतिपादन उपराष्ट्रपती C.P. राधाकृष्णन यांनी केले.

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा लोकभवन येथील दरबारहॉल येथे पार पडला, त्यावेळी या कार्यक्रमात उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन बोलत होते.

यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार,कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा,रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.अपुर्वा पालकर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा, कौशल्य विकास आयुक्त डॉ. अमित सैनी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. सतीश सुर्यवंशी यासह, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे विद्यार्थी उपस्थित होते.

उपराष्ट्रपती C. P. राधाकृष्णन म्हणाले की, विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभातील पदवीधर हे इतिहासाचा भाग बनले आहेत. या विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक यश मिळवले नसून, हे विद्यार्थी भारताला ‘ग्लोबल स्किल हब’ बनवण्याच्या प्रवासात एक मैलाचा दगड रोवणार आहेत. उद्योगांच्या मागणीनुसार अभ्यासक्रमात बदल होणे गरजेचे आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, ग्रीन एनर्जी आणि डेटा ॲनालिटिक्स यांसारख्या आधुनिक विषयांचा समावेश करून विद्यार्थ्यांना जागतिक आव्हानांसाठी तयार केले पाहिजे.दुसऱ्या महायुद्धानंतर नैसर्गिक संसाधने नसतानाही जपानने केलेली प्रगती ही त्यांच्या कठोर परिश्रमामुळे आणि शिस्तीमुळे आहे. काम करताना जपानी लोक कधीही विचलित होत नाहीत. हीच कामाप्रती निष्ठा भारतीय तरुणांनी अंगीकारली पाहिजे असेही ते म्हणाले.

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन म्हणाले की,उद्योजक बनू इच्छिणाऱ्या तरुणांनी रतन टाटा यांचा आदर्श ठेवावा. मुंबईतील वीज पुरवठ्याचे उदाहरण देत त्यांनी टाटांच्या जिद्दीचे कौतुक केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनला असून, आता तिसऱ्या क्रमांकाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. ही प्रगती साधताना तरुणांनी ‘स्किल इंडिया’ आणि ‘पीएम-दक्ष’ सारख्या व्यासपीठांचा लाभ घ्यावा, असा सल्ला त्यांनी दिला.आज ज्यांना पदवी मिळाली म्हणजे शिक्षण संपले असे नाही. आयुष्यभर नवीन गोष्टी शिकण्याची तयारी ठेवा. कॅम्पसच्या बाहेर स्पर्धेचे जग कठीण आहे, पण आत्मविश्वासाने संकटांचा सामना केल्यास यश तुमचेच आहे असेही ते म्हणाले.

No comments to show.

Leave a Comment