सातारा जिल्हा परिषदेवर पहिल्यांदाच भाजपाचा झेंडा..
सातारा, दि, २१ मार्च:
सातारा जिल्हा परिषदेमध्ये राजकीय समीकरणांना कलाटणी देणारी मोठी घडामोड घडली. सातारा जिल्हा परिषदेत प्रथमच भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापनेत यश मिळवले आहे. या निवडणुकीत भाजपाचे संख्याबळ केवळ २८ सदस्यांपर्यंत मर्यादित असताना सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे यांनी अतिरिक्त पाठिंबा मिळवत एकूण ३३ सदस्यांचा पाठिंबा भाजपाच्या बाजूने उभा केला.
शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी गटाला केवळ ३० मते मिळाली, ज्यामुळे जिल्ह्यातील सत्ता समीकरण पूर्णपणे बदलले आहे. या निर्णायक बहुमताच्या आधारे भाजपाच्या प्रिया शिंदे यांची सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्ष पदी राजू भोसले यांना संधी मिळाली आहे.
या विजयामुळे केवळ सत्ता परिवर्तन झाले नाही, तर साताऱ्यासारख्या पारंपरिक राजकीय बालेकिल्ल्यात भाजपाने आपली मजबूत पकड निर्माण केल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कॅबिनेट मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली घडलेली ही राजकीय खेळी सातारा जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण ठरली आहे. स्थानिक पातळीवरील सूक्ष्म नियोजन, प्रभावी संवाद आणि संघटन कौशल्य यामुळे भाजपाला हा ऐतिहासिक विजय मिळवता आला.
सातारा जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच भाजपाचा झेंडा फडकला असून, यामुळे आगामी काळात जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तसेच, या निकालामुळे राज्यातील राजकीय समीकरणांवरही दूरगामी परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Leave a Comment