सोलापूरातील अवैध उत्खननाविरोधात संयुक्त कारवाई..
मुंबई, दि. ४ मार्च २०२६:
सोलापूर जिल्ह्यातील खरातवाडी (ता. पंढरपूर) येथे अवैध मुरुम उपसा रोखण्यासाठी गेलेल्या महिला वन अधिकारी शीतल चाटे यांच्या अंगावर टिप्पर घालून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न करणाऱ्या तस्करांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. या प्रकरणातील आरोपींना तडीपार करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली असून, यापुढे महसूल, वन आणि पोलीस विभाग संयुक्त ‘टास्क फोर्स’च्या माध्यमातून वाळू व मुरुम माफियांविरुद्ध मोहीम राबवतील, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली.
आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर-मंगळवेढा परिसरातील वाढत्या तस्करांच्या दहशतीचा मुद्दा सभागृहात मांडला. उत्तरात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, महिला अधिकाऱ्यांवरील हल्ला ही अत्यंत गंभीर बाब आहे. याप्रकरणी पोलिसांनी विविध कलमान्वये फौजदारी गुन्हे दाखल केले असून वन कायद्यानुसारही कारवाई सुरू आहे. अधिकारी अनेकदा एकटे कारवाई करायला जातात, तेव्हा असे हल्ले होतात. त्यामुळे आता गृह आणि महसूल विभागाने धोरणात्मक निर्णय घेतला आहे की, कोणतीही धाड टाकताना किंवा अवैध वाहतूक रोखताना पोलीस आणि महसूल विभागाचे ‘जॉइंट ऑपरेशन’ (संयुक्त मोहीम) अनिवार्य असेल. पोलिसांनी आधीच संरक्षण देण्याची योजना तयार केली आहे,” असे बावनकुळे यांनी नमूद केले.
तस्करांवर वचक बसवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत माहिती देताना मंत्री बावनकुळे म्हणाले की, आता ‘ड्रोन मॅपिंग’ प्रणाली विकसित केली जात आहे. ज्या ठिकाणी उत्खनन सुरू असेल, तिथे ड्रोनद्वारे सर्वेक्षण आणि गुगल मॅपच्या आधारे देखरेख केली जाईल. यामुळे अवैध उत्खनन आणि मानवी हस्तक्षेपाशिवाय प्रभावी नियंत्रण मिळवणे शक्य होईल. अवैध उत्खननाच्या मागे मोठे रॅकेट कार्यरत असले तरी, आता पोलीस, महसूल आणि वन विभाग एकत्रितपणे ताकदीने या माफियांवर तुटून पडतील, असा विश्वासही महसूल मंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.









