ग्रँट रोड मधील २६५ रहिवाशांना घरांच्या चाव्यांचे वाटप..
मुंबई, दि. ५ मार्च २६ :
मुंबईतील ग्रँट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीचा पुनर्विकास पूर्ण झाला असून येथील २६५ रहिवाशांना हक्काच्या घरात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या रहिवाशांना हक्काच्या घरांच्या चाव्यांचे वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
गेली २५ वर्षे जुन्या चिखलवाडीचा पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित होता. या काळात ३६ विकासकांनी हा पुनर्विकास करण्याचा प्रयत्न केला. अखेरीस ३७ वे विकासक म्हणून आलेल्या श्रीपती डेव्हलपर आणि आमदार पराग शहा यांनी मिळून हा प्रकल्प हातात घेऊन पूर्ण केला. अवघ्या २ वर्षात या इमारतींचे काम पूर्ण झाले असून त्यामुळे २६५ रहिवाशांना घर देणे शक्य झाले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काही रहिवाशांना प्रतिकात्मकरित्या या चाव्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी आमदार पराग शहा, म्हाडाचे अध्यक्ष संजीव जयस्वाल, मुख्याधिकारी मिलिंद शंभरकर, श्रीपती डेव्हलपर्सचे सतीश चतुर्वेदी, जुनी चिखलवाडी रहिवाशी संघाच्या अध्यक्ष सुरेखा परब, सरचिटणीस चिंतामण दळवी आणि सर्व रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वतःच्या हक्काच्या घरात राहणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते, ते स्वप्न आज जुन्या चिखलवाडीतील रहिवाशांचे पूर्ण होत असल्याचा विशेष आनंद वाटत असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. शासनाने क्लस्टर योजनेला मंजुरी दिली, त्या अंतर्गत देण्यात आलेल्या इन्सेटिव्हचा लाभ रहिवाशांना देण्याचे निर्देश दिले त्यामुळेच १२० चौरस फुटांच्या घरात राहणाऱ्या लोकांना आता ५८५ स्क्वेअर फुटांचे मोठे असे २ बीएचके घरे देणे शक्य झाले असल्याचे श्री.शिंदे यांनी यावेळी सांगितले. याठिकाणी अतिशय उत्तम घरे विकासकाने दिलेली असून, विक्रीयोग्य घरांच्या एवढीच उत्तम घरे स्थानिक रहिवाशांनाही दिलेली असल्याचे सांगितले. याठिकाणी जिम, लायब्ररी, लग्नाचा हॉल अशा अनेक सुखसोयी देण्यात आल्या आहेत असे सांगितले.
मुंबईतील ४० लाख लोकांना घरे देण्याचे स्वप्न बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिले होते. क्लस्टर योजनेला मंजुरी देऊन तेच स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करत असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. या सेस इमारतींप्रमाणे नॉन सेस इमारतींचे क्लस्टर उभारण्याचा देखील प्रयत्न म्हाडाच्या माध्यमातून करण्यात येईल. घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगरचा रखडलेल्या पुनर्विकासाला आम्ही चालना दिली असून १७ हजार घरांचा प्रकल्प तिथे साकारला जात आहे.
हा प्रकल्प SRA आणि MMRDA च्या माध्यमातून राबवला जात आहे, तर ठाण्यातील क्लस्टर प्रकल्प ठाणे मनपा आणि सिडकोच्या माध्यमातून राबवला जात आहे. याशिवाय मुंबईतील जे प्रकल्प विकासकांनी अर्धवट सोडून दिलेत ते पूर्ण करण्यासाठी, SRA, म्हाडा, BMC, MSRDC, महाप्रीत, MMRDA अशा प्राधिकरणाच्या माध्यमातून गती देण्यात येणार आहे.
जनतेला वेळेत घरे देणाऱ्या विकासकाला फुले तर लोकांना नाडणाऱ्या विकासकाला नारळ देण्यात मी मागेपुढे पाहत नाही असे शिंदे यांनी स्पष्ट केले. पुनर्विकास प्रकल्प रखडल्यामुळे मुंबईबाहेर फेकला गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणण्याचा आमचा प्रयत्न असून त्यासाठीच अशा क्लस्टर योजनांना प्रोत्साहन देत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
गृहनिर्माण मंत्री झाल्यानंतर आपण अनेक पथदर्शी निर्णय घेतले असून नवीन गृहनिर्माण धोरणाला मंजुरी दिली. या अंतर्गत नोकरदार, कामगार, महिला, ज्येष्ठ नागरिक, मुंबईचे डबेवाले यांनाही सवलतीच्या दरात घरे देण्याचे निश्चित करण्यात आले असून मुंबईत काम करण्यासाठी येणाऱ्या नोकरदार महिलांसाठी पहिले वसतिगृह ताडदेव येथे उभारण्याला मंजुरी दिली असल्याचे यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
रहिवाशांना मिळणार रंगीत tv..
जुनी चिखलवडीमधील रहिवाशांना नवीन घरे मिळाल्यामुळे त्यांचे गृह स्वप्न पूर्ण झालेच आहे. पण नवीन घरची चावी द्यायला मी आल्याने त्यांना घरासह एखादी भेटवस्तू मिळायला हवी अशी अपेक्षा शिंदे यांनी यावेळी विकासाकडे व्यक्त केली. तसेच नवीन घरासह त्यांना एक टीव्ही देखील द्या अशी आग्रही मागणीच त्यांनी विकासक सतीश चतुर्वेदी यांना केली. अखेर शिंदे यांचा मान राखून चतुर्वेदी यांनी प्रत्येक रहिवाशाला घरासोबतच २४ इंची कलर टीव्ही भेट म्हणून देऊ असे यावेळी कबूल केले.









