मुंबई नंतर बारामतीमध्येही FIR घेण्यास नकार..
बारामती, दि. २७ फेब्रुवारी;
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनावरून सुरू झालेला वाद मिटता मिटत नाही. आमदार रोहित पवार हे हा अपघात नसून घातपात आहे व याप्रकरणी गुन्हा दाखल करून घ्यावा यासाठी आग्रही आहे परंतु मुंबईत मरीन लाईन्स पोलिसांनी जसा गुन्हा नोंदवून घेण्यास नकार,दिला तसाच नकार बारामती पोलिसांनाही दिला आहे.
यावर संताप व्यक्त करत आमदार रोहित पवार म्हणाले की, अजित पवारांच्या संशयास्पद अपघाती निधनाने लोकांमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे. हा निव्वळ अपघात नाही तर VSR कंपनीचा अक्षम्य निष्काळजीपणा आणि DGCA कडून झालेलं दुर्लक्ष याला कारणीभूत असल्याचं खुद्द DGCA च्या अहवालातूनच स्पष्ट झालं. तसंच विमान उडवण्यास हवामान योग्य असल्याचा ग्रीन सिग्नल देणारी ॲरो कंपनी या घटनेला तेवढीच कारणीभूत आहे. त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत या सर्वांविरोधात FIR दाखल झाला पाहिजे.
मुंबईत FIR दाखल करुन घेण्यास पोलिसांनी नकार दिला त्यामुळं ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली त्या बारामती तालुका पोलीस ठाण्यात अजित पवारांवर प्रेम करणाऱ्या सामान्य माणसांसह जाऊन सर्व कायदेशीर बाबी स्पष्ट करत याप्रकरणी एफआयआर दाखल करण्याची मागणी केली, परंतु इथंही दबावाखाली असलेल्या पोलिसांनी एफआयआर दाखल करुन घेण्यास असमर्थता दर्शवली. ही अजित पवार यांच्या मृत्यूची क्रूर चेष्टा असून ती कदापि खपवून घेतली जाणार नाही.
VSR कंपनी, DGCA, ॲरो आणि इतर सर्वच या अपघाताला कारणीभूत असून त्यांना कोण वाचवतंय? हा तपास असाच दबावाखाली होत राहिला आणि यातील दोषींना वाचवण्याचा प्रयत्न झाला तर जनतेच्या संतापाचा कडेलोट होईल आणि त्याची जबाबदारी दबाव आणणाऱ्यांना घ्यावी लागेल. या विषयात कुणी, कितीही अडथळे आणले तरी आम्ही मात्र थांबणार नाही.. या अपघाताला कारणीभूत असलेल्यांना गजाआड केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा आ. रोहित पवार यांनी दिला आहे.









