20201005_124350

गुप्तेश्वरी नट्या व ‘गुप्तेश्वर’ आता कोणते प्रायश्चित्त घेणार?
मुंबई, दि. 5 ऑक्टोबर :
बाॅलिवूड अभिनेता सुशांतसिंगने आत्महत्या केल्याचा अहवाल एम्स ने दिल्यानंतर आता शिवसेना आक्रमक झाली आहे.  सुशांत सिंग प्रकरणाचं भांडवल करून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम करणा-यांचा समाचार शिवसेनेचे मुखपत्र सामनातून घेण्यात आला आहे.

सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे, ‘सुशांत राजपूतच्या दुर्दैवी मृत्यूस 110 दिवस झाले. या काळात मुंबई पोलिसांची ज्यांनी यथेच्छ बदनामी केली, मुंबई पोलिसांच्या तपासावर ज्यांनी रोज प्रश्नचिन्ह निर्माण केले, त्या राजकीय पुढाऱ्यांनी, कुत्र्यासारख्या भुंकणाऱ्या गलिच्छ वृत्तवाहिन्यांनी महाराष्ट्राची माफीच मागायला हवी. या सगळ्यांनी महाराष्ट्राच्या प्रतिमेस ठरवून कलंक लावण्याचा प्रयत्न केला. हे एक कट कारस्थानच होते. सबब, या सगळ्यांवर महाराष्ट्र सरकारनं अब्रुनुकसानीचा दावाच ठोकला पाहिजे”

‘बिहार निवडणुकीत प्रचाराचा कोणताही मुद्दा नसल्याने नितीश कुमार व तेथील राजकारण्यांनी हा मुद्दा उचलला. त्यासाठी राज्याचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर यांना वर्दीतच नाचायला लावले व शेवटी हे महाशय नितीश कुमार यांच्या पक्षात सामील झाल्याने एक प्रकारे खाकी वर्दीचेच वस्त्रहरण झाले. मुंबई पोलीस सुशांतचा तपास करू शकत नाहीत म्हणून सीबीआयला बोलवा असे किंचाळणाऱ्यांनी मागच्या 40-50 दिवसांत सीबीआय काय करतेय? हा साधा प्रश्न विचारला नाही. सुशांत प्रकरणाचे भांडवल करून महाविकास आघाडीचे सरकार व मुंबई पोलिसांची ‘मीडिया’ ट्रायल केली! स्वतःच पत्रकारितेतील हरिश्चंद्राचा अवतार समजणारे प्रत्यक्षात हरामखोर, बेइमानच निपजले! त्या बेइमानांच्या विरोधात मराठी जनतेने ठाम भूमिका घेतलीच पाहिजे.
मुंबई पोलिसांनी जो तपास केला ते सत्य सीबीआय आणि ‘एम्स’च्या डॉक्टरांनाही बदलता आले नाही. हा मुंबई पोलिसांचा विजय आहे. अनेक गुप्तेश्वर आले गेले, पण मुंबई पोलिसांच्या प्रतिष्ठेचा झेंडा कायम फडकत राहिला’.

‘सुशांतच्या मृत्यूचे ज्यांनी भांडवल केले, मुंबईला पाकिस्तानची, बाबराची उपमा दिली त्या नटीबाई आता कोणत्या बिळात लपल्या आहेत? हाथरसमध्ये एका तरुण मुलीवर बलात्कार करून मारले, तेथील पोलिसांनी त्या मुलीचा देह विटंबना करून काळोखात जाळला याबद्दल त्या नटीने डोळ्यात ग्लिसरीन घालूनसुद्धा दोन अश्रू ढाळले नाहीत. ज्यांनी त्या मुलीवर बलात्कार केला ते या नटीबाईचे भाईबंद आहेत का? ज्या पोलिसांनी त्या मुलीस जाळले ते पोलीस त्या नटीबाईचे घरगडी आहेत काय? ज्यांनी मागच्या शंभर दिवसांत महाराष्ट्राची, मुंबई पोलिसांची यथेच्छ बदनामी केली, अशा गुप्तेश्वरी नट्या आणि ‘गुप्तेश्वर’ आता कोणते प्रायश्चित्त घेणार आहेत?

जे महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या वाटेला गेले, त्यांचे साफ वाटोळे होते. बेइमान, हरामखोरांनी हे आता तरी समजून घ्यावे. हाथरस बलात्कार प्रकरणात शेपूट घालून बसणाऱ्यांनी महाराष्ट्राच्या मर्दानगीची परीक्षा घेऊ नये!’, असा सामनाच्या अग्रलेखातून निशाणा साधण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *