भिवंडीत काँग्रेसच्या पाठिंब्यावर BJP बंडखोर महापौर.

भिवंडीत काँग्रेसच्या पाठिंब्यावर bjp बंडखोर महापौर.

मुंबई,  दि. २० फेब्रुवारी २६ ;

भिवंडी निजामपूर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाला जोरदार धक्का बसला आहे. भाजपातुन बाहेर पडून स्वतंत्र गट स्थापन केलेले नारायण चौधरी काँग्रेस,  शरद पवार NCP च्या पाठिंब्यावर महापौर बनले तर काँग्रेस चा उपमहापौर विजयी झाला.

भाजपाच्या पक्षादेशा (व्हीप) विरोधात बंडखोरी करणा-या नारायण चौधरी आणि त्यांच्याबरोबरच्या नगरसेवकांवर कारवाई केली जाणार असल्याची घोषणा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केली.

यावेळी चव्हाण म्हणाले की, महापौरपदासाठी भिवंडीच्या स्थानिक समितीकडून बहुमताने नारायण चौधरी यांचे नाव पाठविण्यात आले होते. त्यानुसार पक्षाकडून श्री. चौधरी यांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगण्यात आले होते. मात्र ब-याच चर्चेअंती अखेर स्थानिक पातळीवर कुठल्याही स्वरुपाचे वाद टाळण्यासाठी भाजपा प्रदेश स्तरावर स्नेहा पाटील यांना पक्षाच्या महापौरपदाच्या उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले.

चौधरी यांचे कोणार्क विकास आघाडीच्या विलास पाटील यांच्यासोबतचे स्थानिक पातळीवरचे मतभेद लक्षात घेता वाद टाळण्यासाठी महापौर पदाचा उमेदवार बदलण्याचा निर्णय प्रदेश स्तरावर पक्षहितासाठी घेण्यात आला. त्यानंतरही नाराज चौधरी आणि त्यांच्या बरोबरच्या नगरसेवकांनी बंडखोरी करू नये यासाठी अखेरपर्यंत अनेक प्रयत्न करण्यात आले.

मात्र दुर्दैवाने त्या प्रयत्नांना यश आले नाही असे श्री. चव्हाण यांनी नमूद केले. बंडखोरी करणाऱ्या सर्व नगरसेवकांवर कारवाई करणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

*(मुकुंद कुलकर्णी)*
कार्यालय सचिव

Leave a Comment