शिवसेनेचे ZP त १५७ तर पंचायत समित्यांत ३१५ उमेदवार विजयी.
शिवसेनेचे ZP त १५७ तर पंचायत समित्यांत ३१५ उमेदवार विजयी.
मुंबई, ता. १० फेब्रुवारी ..
राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठं यश मिळाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितींमध्ये ४५ टक्के स्ट्राईक रेट राहिला. कोकणात पुन्हा एकदा शिवसेनेची भगवी लाट आली असून रत्नागिरी जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला. रायगड आणि छत्रपती संभाजी नगरमध्ये शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला.
राज्यातील जनतेने सलग चौथ्या निवडणुकीत शिवसेनेला भरघोस मतदान करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले. जिल्हा परिषद निवडणुकीत १५७ उमेदवार निवडून आले तर पंचायत समितींसाठी शिवसेनेचे ३१५ विजयी झाले.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हा परिषदांसाठी १५ जाहीर सभा घेतल्या होत्या. रत्नागिरी जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फड़कला. १२५ पंचायत समित्यांपैका २५ हून अधिक पंचायत समित्यांची सत्ता शिवसेनेला मिळाली. तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेसाठी शिवसेनेचे १९ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी १३ उमेदवार विजयी झाले असून शिवसेनेचा ६५ टक्के स्ट्राईक रेट नोंदवला आहे. सिंधुदुर्गातील पंचायत समिती गणांमधून शिवसेनेचे २८ उमेदवार विजयी झाले. रत्नागिरी जिल्हा परिषदेसाठी ४८ उमेदवार निवडणुकीत होते त्यापैकी तब्बल ४१ उमेदवार विजयी झाले तर पंचायत समित्यांमध्ये ७५ उमेदवार विजयी झाले. रायगड जिल्हा परिषदेवर शिवसेनेचे १९ उमेदवार विजयी झाले आहेत तर पंचायत समित्यांमध्ये ३८ उमेदवार विजयी झाले.
मराठवाड्यातील परभणी जिल्हा परिषदेत ५ आणि पंचायत समितींमध्ये ६ उमेदवार विजयी झाले. छत्रपती संभाजी नगरात २१ जिल्हा परिषद गट आणि ५१ गणांमध्ये शिवसेनेचा विजय झाला. धाराशीवमध्ये १४ जिल्हा परिषद गटांमध्ये आणि ३३ पंचायत समिती गणांमध्ये शिवसेना विजयी झाली. लातूरमध्ये मात्र शिवसेनेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत एका जागेवर समाधान मानावं लागलं.
पश्चिम महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढली आहे. सातारा जिल्हा परिषदेत शिवसेनेचे १६ उमेदवार विजयी झाले तर पंचायत समित्यांमध्ये २४ गणांमध्ये शिवसेनेचा विजय झाला. सोलापूरमध्ये जिल्हा परिषदेच्या ६ आणि पंचायत समित्यांमध्ये ७ जागांवर शिवसेनेचा विजय झाला. सांगली जिल्ह्यातही शिवसेनेने मुसंडी मारली असून खानापूर तालुक्यात एकहाती सत्ता मिळवली. सांगली जिल्हा परिषदेच्या ७ आणि पंचायत समित्यांमध्ये १९ गणांमध्ये शिवसेनेचा विजय झाला. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ९ जागा शिवसेनेने जिंकल्या तसेच पंचायत समित्यांच्या २० गणांमध्ये शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. पुणे जिल्ह्यात ५ जिल्हा परिषद गट आणि १२ पंचायत समिती गणांमध्ये शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. याउलट उबाठा पक्षाची राज्यभरात पिछेहाट झाली आहे. शिवसेनेच्या तुलनेत उबाठाला १२ जिल्हा परिषदांमध्ये एक तृतीयांश देखील जागा मिळाल्या नाहीत.
