महायुतीकडून BMC महापौरपदासाठी रितू तावडे.
महायुतीकडून BMC महापौरपदासाठी रितू तावडे.
मुंबई, दि ०७ फेब्रुवारी २०२६;
भारतीय जनता पक्षाने रितू तावडे यांच्या नावाची घोषणा महापौर पदाच्या उमेदवारीसाठी केली आहे. तर शिवसेनेकडून संजय घाडी यांचे नाव उपमहापौर पदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले आहे.
महापौर आणि उपमहापौर पदाच्या उमेदवारीसाठीच्या नावांची घोषणा महायुतीच्या वतीने भाजपा मुंबई अध्यक्ष आणि आमदार अमीत साटम यांनी केली. यावेळी भाजपचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा, माजी खासदार मनोज कोटक, भाजप गटनेते गणेश खणकर, सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी, श्रीमती श्वेता परुळकर, ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे, शिवसेनेचे सरचिटणीस राहुल शेवाळे, शिवसेना गटनेते अमेय घोले, शिवसेनाच्या शीतल म्हात्रे, नवनिर्वाचित नगरसेवक तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
महापौरपदासाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. येत्या ११ फेब्रुवारी रोजी महापौर पदासाठी निवडणूक होणार असून त्यासाठी शेवटच्या टप्प्यात भाजपकडून रितू तावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. रितू तावडे या घाटकोपर येथील प्रभाग क्रमांक १३२ मधून नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. याशिवाय त्यांनी याआधी मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्षपदही भूषविले आहे. भाजपा हा सध्या महापालिकेतील सर्वात मोठा पक्ष असून रितू तावडे या महापालिकेच्या कामकाजाचा अनुभव असलेल्या तसेच संघटनात्मक दृष्टीकोनातून मजबूत अशा उमेदवार म्हणून ओळखल्या जातात.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रितू तावडे म्हणाल्या, “महापौर नाही तर मी मुंबईची सेवक म्हणून काम करणार आहे. भारतीय जनता पक्ष हा शिस्तबद्ध पक्ष आहे. त्यामुळे वरिष्ठ जो निर्णय देतात तो सर्व कार्यकर्त्यांना मान्य असतो. माझ्यासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे.”
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेकडून प्रभाग क्रमांक ५ चे नगरसेवक संजय घाडी यांना उपमहापौर पदाची उमेदावारी जाहीर करण्यात आली आहे आणि हे उपमहापौरपद पुढील सव्वा वर्षासाठी असणार असल्याचेही शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
महापौर आणि उपमहापौर पदाची अधिकृत उमेदवारी जाहीर झाली असली तरी संख्याबळाचा विचार करता आगामी काळात ही निवडणूक बिनविरोध होऊन महायुतीच्या उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे.
