मोदींच्या अर्थसंकल्पाने महाराष्ट्राच्या हाती दिला खुळखुळा..

0
ANI-20260201027-0_1769930555723_1769930565654_1769936381084

मोदींच्या अर्थसंकल्पाने महाराष्ट्राच्या हाती दिला खुळखुळा..

नवी दिल्ली, दि. २ फेब्रुवारी २०२६ ;

देशाला सर्वाधिक महसूल आणि कर देणाऱ्या महाराष्ट्राच्या हातात मोदी सरकारने अर्थसंकल्पातून अक्षरशः खुळखुळा दिला आहे. मुंबई व महाराष्ट्रासाठी या अर्थसंकल्पात कोणतीही भरीव तरतूद करण्यात आलेली नाही. केंद्रीय अर्थसंकल्पाने मुंबई व महाराष्ट्राची निराशा केली आहे. महाराष्ट्रावर कितीही अन्याय केला तरी, त्यावर जाब विचारावा एवढी राज्य सरकारची धमक व कुवतही नाही. आजच्या अर्थसंल्पाने भाजप सरकारचे महाराष्ट्रद्वेषी धोरण पुन्हा एकदा उघड झाले आहे, अशी प्रतिक्रिया मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पावर बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणल्या की, एकंदरीत पाहता मोदी सरकारचा अर्थसंकल्प हा दिशाहीन, जनविरोधी व निराशाजनक आहे. या अर्थसंकल्पात कोणतेही ठोस धोरण नाही. रोजगार निर्मितीसाठी कोणताही स्पष्ट आराखडा नाही, महागाई नियंत्रणासाठी कोणतीही इच्छाशक्ती नाही. आर्थिक विषमता दूर करण्याबाबत कुठलीही बांधिलकी नाही. जागतिक पातळीवर अनिश्चिततेचे वातावरण असताना धाडसी आर्थिक सुधारणा आवश्यक होत्या मात्र मोदी सरकारकडे भारताच्या भविष्यासाठी कोणताही ठोस रोडमॅप नाही. शेतकरी कर्जमाफी, महिला सक्षमीकरण याबद्दल अर्थसंकल्पात एक शब्दही नाही. मागील अर्थसंकल्पात बिहार व आंध्र प्रदेशच्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सवलतींची खैरात वाटण्यात आली होती, यावेळीही ज्या राज्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत, त्यांच्यावरच मोदी सरकार मेहरबान झाल्याचे दिसत आहे आणि मुंबई व महाराष्ट्राकडे पूर्ण दुर्लक्ष केलेले आहे.

मुंबईकर दररोज जीव मुठीत घेऊन लोकलमधून प्रवास करत आहे, या लोकल सेवांमध्ये सुविधा देण्याविषयी काहीच योजना नाहीत. मुंबईच्या पायाभूत सुविधांबद्दल काही तरतूद केलेली नाही, केवळ बुलेट ट्रेनसाठी तरतूद करून मुंबईला त्याचा काही फायदा होणार नाही. मुंबईच्या कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. चित्रपट दिग्दर्शक रोहीत शेट्टी यांच्या घरासमोर मध्यरात्री गोळीबार करण्यात आला, याआधी सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आला, सैफ अली खानच्या घरात जाऊन जीवघेणा हल्ला करण्यात आला. आमदार बाबा सिद्दीकी यांची त्यांच्या कार्यालयासमोर हत्या करण्यात आली, महिला व मुली सुरक्षित नाहीत, त्याकडे भाजपा सरकारचे लक्ष नाही. एकूणच मोदी सरकारने अर्थसंकल्पातून मुंबई व महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली आहेत, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *