राजकारणापेक्षा देश, राज्य आणि समाज मोठा..
राजकारणापेक्षा देश, राज्य आणि समाज मोठा..
ठाणे, दि. २६ जानेवारी २६:
सत्तासंघर्ष, राजकारणापेक्षा राज्य, देश आणि समाज मोठा असतो. धर्माच्या पलीकडे जाऊन कोणावरही अन्याय न होऊ देता सर्व समाजघटकांना सोबत घेऊन कल्याणकारी स्वराज्याची निर्मिती करायची आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

77 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाणे पोलीस क्रीडा संकुल, साकेत मैदान येथे राष्ट्रध्वजवंदन व भव्य संचलन समारंभ पार पडला. या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित करताना राज्य, देश आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आजचा दिवस हा आपल्या लोकशाहीचा उत्सव आहे. ज्या संविधानाने प्रत्येक भारतीयाला न्याय, अधिकार आणि स्वातंत्र्य दिले त्या संविधानाचा आणि भारतमातेचा जयजयकार करण्याचा हा दिवस आहे. प्रजासत्ताक या शब्दात आधी ‘प्रजा’ म्हणजे नागरिक आणि नंतर ‘सत्ता’ येते, हे कधीही विसरता कामा नये. सत्तासंघर्षापेक्षा देश, राज्य आणि समाज मोठा असतो, ही शिकवण आपल्या संविधानाने दिली आहे.
यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच सर्व थोर स्वातंत्र्यसैनिक व समाजसुधारकांना विनम्र अभिवादन केले. देशाला स्वातंत्र्य आणि लोकशाहीची दिशा देणाऱ्या सर्व महान व्यक्तींप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमाला आमदार संजय केळकर, रवींद्र पाठक, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण, विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, कर्मचारी, माध्यम प्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
मराठी माणसाचा आवाज बुलंद करणारे बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सरकारतर्फे पुढील वर्षभर सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय उपक्रम राबवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मिता जपण्याचे कर्तव्य सरकार प्रामाणिकपणे पार पाडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ठाणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हा आपला मुख्य उद्देश असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पायाभूत सुविधा, वाहतूक कोंडीमुक्त प्रवास, शेती प्रगती, उद्योग व्यवसायांना चालना आणि रोजगार निर्मिती यावर सरकार भर देत असल्याचे स्पष्ट केले. परवडणाऱ्या आणि पर्यावरणपूरक घरांची निर्मिती, रखडलेले पुनर्विकास प्रकल्प, एसआरए आणि क्लस्टर प्रकल्पांना गती देण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली जवळपास 30 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूक करारांवर स्वाक्षऱ्या झाल्याने सुमारे 40 लाख रोजगार निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहेत.
‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम देशातील एक यशस्वी आणि विक्रमी उपक्रम ठरला असून लाखो नागरिकांना त्याचा लाभ मिळाल्याचे त्यांनी सांगितले. ठाणे जिल्ह्यात 431 ग्रामपंचायतींमध्ये डोअरस्टेप डिलिव्हरी सेवा सुरू असून हजारो नागरिकांना घरबसल्या शासकीय कागदपत्रे मिळत असल्याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले.
ठाणे जिल्ह्याने मोबाईल मेडिकल युनिटमध्ये पहिला क्रमांक पटकावला असून डोंगराळ भागातही रुग्णवाहिका पोहोचवली जात आहे. मानसिक आरोग्यासाठी ‘मायका’ हे मराठीतील पहिले मानसिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले आहे. 21 प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि 31 शाळांचे स्मार्ट रूपांतर करण्यात आले असून कल्याणमधील 30 शाळांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चाचण्या सुरू केल्याचे सांगितले.
‘लाडकी बहीण’ योजनेतून हजारो महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य दिले जात असून अनेक महिला स्वयंरोजगाराकडे वळल्या आहेत. जिल्ह्यातील 47 हजारांहून अधिक महिला लखपती झाल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. प्रधानमंत्री जनजाति आदिवासी न्याय महाअभियानांतर्गत राज्यात सर्वाधिक म्हणजे जवळपास 12 हजार कातकरी कुटुंबांना घरकुले मंजूर करण्यात आली आहेत.
ठाणेकरांच्या प्रतीक्षेत असलेली मेट्रो-4 आणि मेट्रो-4A यशस्वी चाचण्या पूर्ण झाल्या असून लवकरच ती प्रवाशांच्या सेवेत धावणार आहे. मेट्रो-5 मुळे ठाणे, भिवंडी, कल्याण आणि नवी मुंबई एकमेकांशी जोडली जाणार आहेत. पनवेल–कर्जत रेल्वेमार्ग, कल्याण–बदलापूर तिसरी व चौथी मार्गिका, ईस्टर्न फ्रीवे विस्तार, कोस्टल रोड, तसेच ठाणे–बोरिवली बोगदा प्रकल्प वेगाने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
ठाणे शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी काळू धरण प्रकल्पाला गती देण्यात आली आहे. पर्यावरण समतोल राखण्यासाठी अर्बन फॉरेस्ट, मॅन्ग्रोव्ह संरक्षणासाठी ग्रीन टीडीआर धोरण, तसेच सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यात येत आहे. शेती क्षेत्रात नैसर्गिक शेतीचा विस्तार आणि ठाणे पॅटर्नची ओळख निर्माण करण्यात येत आहे.
2047 पर्यंत भारताला आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनवण्याच्या दिशेने महाराष्ट्र देशाचे ग्रोथ इंजिन ठरेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी ठाणे जिल्ह्याचा मोठा वाटा असेल,असे सांगितले.‘विकसित ठाणे, विकसित महाराष्ट्र, विकसित भारत’ हेच आपले स्वप्न असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
