संविधानाने सर्वात मोठा अधिकार मतदानाचा दिला..
संविधानाने सर्वात मोठा अधिकार मतदानाचा दिला..
मुंबई दि. २६ जानेवारी २६;
देशाचा कणा असलेल्या शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ दिला जाणार नाही. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे जर शेती, शेतकरी किंवा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठामपणे त्याविरोधात उभा राहील, असे पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश कार्यालय, मुंबई येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याच दिवशी देशाला भारतीय संविधान लागू झाले. या संविधानातून मिळालेल्या अधिकाराबद्दल सुप्रिया सुळे यांनी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्यासह इतर सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशाचे संविधान आणि लोकशाही अबाधित राहण्यासाठी सर्वत्र प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी सुप्रिया सुळे यांनी उपस्थितांना केले. तसेच यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते व उपस्थित नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वात उत्तम संविधान आपल्याला दिले आहे. संविधान समितीने जगाला एक व्यापक विचार दिलेला आहे. संविधानामध्ये अनेक प्रश्नांचे उत्तर बाबासाहेबांनी लिहून दिलेले आहे. जेव्हा जेव्हा देशावर संघर्षाची वेळ येते त्या संघर्षावर कशाप्रकारे मात करायची हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात दिलेले आहे. असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
देशाचा 77 व्या प्रजासत्ताक आज साजरा होत आहे. ज्यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी त्याग केला त्यांची आठवण आपण काढली पाहिजे. या जगातील सर्वोत्तम संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिले आहे. संविधानाने सगळ्यात मोठा अधिकार दिला तो म्हणजे मताचा अधिकार अगदी पंतप्रधान असू दे किंवा सामान्य नागरिक असू दे प्रत्येकाला एक मत देण्यास अधिकार संविधानाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मिळालेला आहे. काही वर्षांपूर्वी संविधानावर हल्ला होईल काय अशी परिस्थिती झाली होती. ज्यांनी ज्यांनी संविधानाच्या विरोधात भाषा केली त्यांना जागा दाखवण्याचं काम मतदारांनी केलं, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
देशातील काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्याला न्याय मिळावा यासाठी आपण लढलं पाहिजे. सध्या शेतकऱ्यांची अवस्था फार विकत आहेत. शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही. त्याकरिता आपण लढलो पाहिजे. हा देश लोकशाही पद्धतीनेच चालणार; इथे दडपशाहीला आम्ही थारा देणार नाही. असे सुप्रिया सुळे यांनी बोलताना स्पष्ट केले आहे.
