मुंबई, ठाणे, कल्याण, उल्हासनगरात महायुतीचाच महापौर..

0
IMG-20260123-WA0077

मुंबई,ठाणे,कल्याण,उल्हासनगरात महायुतीचाच महापौर..

मुंबई, दि. २५ जानेवारी २०२६ ;

मुंबईकरांना २५ वर्ष खड्ड्यात घालणारे, प्रदूषण आणि भ्रष्टाचाराने मुंबईची दुर्देशा केल्यामुळेच त्यांचा महापालिका निवडणुकीत पराभव झाला, अशी घणाघाती टीका शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर केली. शिवसेना भाजप युती मजबूत असून मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर येथे महायुतीचाच महापौर बसेल, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुंबई महापालिकेत २५ वर्ष सत्ता आणि २०१९ पासून अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना उबाठाने प्रकल्प रोखून धरले. कोविड काळात भ्रष्टाचार केला. २०२२ मध्ये महायुती सरकारने सगळे अडथळे दूर केले. सात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे काम हाती घेतले. मुंबईची दुर्देशा केल्यानेच जनतेने निवडणुकीत त्यांचा पराभव केला, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. धर्मवीर आनंद दिघे यांचा बालेकिल्ला असलेला ठाणे जिल्हा हा भगव्या रंगाचा आहे आणि तो भगवाच राहणार, असे ते म्हणाले. मुंब्रा ठाणे जिल्ह्यातच आहे, असा इशाराही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना दिला.

मनसेने कल्याण डोंबिवलीत शिवसेनेला दिलेल्या पाठिंब्याबाबत उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, कल्याण डोंबिवलीच्या विकासासाठी मनसेने शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. यापूर्वी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मनेस महायुतीसोबत होती. कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना व भाजप महायुती म्हणून निवडणूक लढले आणि महायुती म्हणूनच सत्ता स्थापन करु, असे ते म्हणाले. दोन चार महापालिका वगळ्यास बहुतांश ठिकाणी शिवसेना भाजप महायुतीचा महापौर बसेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले की, आमची विचारधारा बाळासाहेबांसोबत आहे. शिवसेना भाजप युती ही बाळासाहेब,वाजपेयी, अडवाणी पासून आता पंतप्रधान नरेंद्र मोदीजीपर्यंत सुरु आहे. २०१९ मध्ये शिवसेना भाजप युतीला बहुमत असताना बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करुन ज्यांनी सरकार बनवले ते जनमत विरोधी होते, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठावर केली. विरोधकांचे खूप प्रेम असल्याने त्यांना उठता, बसता आणि स्वप्नात मी दिसतो, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला. बदलापूरमधील घटना दुर्देवी असून आरोपींना कठोर शिक्षा केली जाईल, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *