पुणतांब्यातील जुने KT वेअर‘व्हर्टिकल बॅरेज’करणार..
पुणतांब्यातील जुने KT वेअर‘व्हर्टिकल बॅरेज’करणार..
शिर्डी, दि.२२ जानेवारी २६ :
पुणतांबा व परिसरातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी पुणतांबा येथील जुन्या के.टी. वेअरचे आधुनिक’व्हर्टिकल बॅरेज’ मध्ये रूपांतर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी अंदाजे ४० ते ५० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, या प्रकल्पामुळे पाणीसाठ्यात २० टक्क्यांनी वाढ होईल व पाण्याची गळती १०० टक्के थांबेल, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
शेतकऱ्यांना दिवसा १२ तास अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी पुणतांबा परिसरात ७६ एकर जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असून, यामुळे पुणतांबा, नपावाडी, रामपूरवाडी व पिंपळवाडी या गावांतील शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्नही निकाली निघेल,अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
पुणतांबा येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ‘राज्य कृषी यांत्रिकीकरण योजने’अंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व आधुनिक कृषी अवजारांचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले.
जलसंपदा विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देताना विखे पाटील म्हणाले, गोदावरी कालव्याच्या १०० वर्षांच्या इतिहासात प्रथमच नूतनीकरण व सक्षमीकरणासाठी ४०० कोटी रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. वितरिका क्रमांक १८ आणि १९ च्या माध्यमातून कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. तसेच कोकणातून वाया जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून नगर जिल्ह्यासह संपूर्ण भाग दुष्काळमुक्त करण्यासाठी ९० हजार कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात येत आहे. यातून ८५ टीएमसी पाणी उपलब्ध होणार असून,त्यातील ५५ TMC जायकवाडी, १५ ते २० टीएमसी भंडारदरा व १५ टीएमसी पाणी मुळा धरणात सोडण्याचे नियोजन आहे.
शिर्डी एमआयडीसीमध्ये संरक्षण साहित्याचे उत्पादन करणारे ‘हब’ विकसित होत आहे. निबे समूहासारख्या उद्योगांमुळे आणि टाटा समूहाच्या २०० कोटींच्या अद्ययावत प्रशिक्षण केंद्रामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. हरेगाव येथे १७ हजार कोटींच्या गुंतवणुकीतून होणाऱ्या ‘सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल’ प्रकल्पामुळे १० हजार रोजगारनिर्मिती अपेक्षित आहे. तसेच शिर्डी विमानतळ विस्तारीकरणासाठी ७०० कोटींचा निधी देण्यात आला असून, एमआरओ सेंटरच्या माध्यमातून ५ हजार तरुणांना रोजगार मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
पुणतांबा येथील गावठाण विस्तार, पाणीपुरवठा योजना व घरकुलांसाठी २२ एकर शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यात आली असून, विकासकामांचा दर्जा उत्तम राखण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत, असे ही पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
