शाळेचा श्रीगणेशा डिजीटल पद्धतीने!

0
UT CM

शाळेचा श्रीगणेशा डिजीटल पद्धतीने!

कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या भागातील शाळा प्रत्यक्ष सुरु होणार.

मुंबई दि १५ जून २०२० (XXL News Team)

शाळा सुरु होणार का, झाल्या तर कशा पद्धतीने, लहान मुलांना शाळेत कसे पाठवायचे अशा अनेक प्रश्नांनी पालकांची झोप उडलेली असतानाच राज्य शासनाने शाळेचा श्रीगणेशा करण्यास करण्यास परवानगी दिलेली  आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण, तसेच शहरांपासून दूरवरील शाळा प्रत्यक्ष सुरु कराव्यात तर दुसरीकडे ऑनलाईन, डिजिटल पद्धत पायलट प्रॉजेक्ट म्हणून तातडीने राबवून यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरु करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शाळा एकवेळ सुरु नाही झाल्या तरी शिक्षण सुरु झाले पाहिजे या विधानाचा पुनरुच्चार केला. ज्या ठिकाणी शाळा प्रत्यक्ष सुरु होत आहेत तिथे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पुरेपूर काळजी घ्यावी असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शाळा कशा सुरु करायच्या ?

शाळा सुरु करण्यासाठी सुरुवातीला शाळा व्यवस्थापन समित्यांची सभा आयोजित केली जाईल, गावांमधील कोविड प्रतिबंध समिती तसेच स्थानिक पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली जाईल, शाळांमध्ये स्वच्छता, निर्जंतुकीकरण, पाण्याची सोय करावी लागणार आहे. गटागटाने पालकसभा घेऊन पालकांच्या मनातील भीती कमी करणे, ग्रामपंचायतीच्या मदतीने टीव्ही, रेडीओ  यांची व्यवस्था करणे जेणेकरून कुठलीच सोय नसलेल्या मुलांना शिक्षणासाठी याची मदत होईल, गुगल क्लास रूम, वेबिनार डिजिटल प्रायोगिक तत्वावर सुरु करणे, ई शैक्षणिक साहित्य निर्मिती, सायबर सुरक्षा, दीक्षा मोबाईल एपचा उपयोग, शाळेच्या स्पीकरवरून विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक माहिती द्यावी असे सांगण्यात आले आहे.

रेड झोनमध्ये नसलेल्या ९, १०,१२ वी शाळा-कॉलेज जुलैपासून, ६ वी ते ८ वी ऑगस्टपासून,  वर्ग ३ ते ५ सप्टेंबरपासून, वर्ग १ ते २ री शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने, इयत्ता ११ वीचे वर्ग पुढील महिन्यात लागणाऱ्या दहावीच्या निकालानंतर सुरु करण्याचे नियोजन आहे. ज्या ठिकाणी शाळा सुरु होणार नाहीत तिथे टाटा स्काय, जिओच्या मदतीने शिक्षणाचे पायलट प्रोजेक्ट लगेचच सुरु करून त्याचा बारकाईने आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ऑनलाईन शाळेबाबत पालकांच्या मतांचा विचार करण्यात आलेला आहे. पहिली व दुसरीची मुले लहान असतात, त्यांच्यासाठी ऑनलाईन पर्याय दिला जाणार नाही. ३ ते ५ वीच्या मुलांना दररोज १ तास व पुढील वर्गाच्या मुलांना दोन तासांपर्यंत ऑनलाईन, डिजिटल शिक्षण देण्याचे नियोजन आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *