मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसच विजयी होईल.

0
IMG-20260115-WA0116

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसच विजयी होईल.

मुंबई, दि. १६ जानेवारी २०२६ ;

महानगरपालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने मोठ्या प्रमाणात भ्रष्ट मार्गाचा वापर केला. पैशांचे वारेमाप वाटप करण्यात आले, मिक्सर वाटण्यात आले पण पोलीसांनी कारवाई केली नाही उलट काँग्रेस कार्यकर्त्यांवरच कारवाई करण्यात आली. निवडणुकीसाठी भाजपाने सर्व वाममार्गाचा अवलंब केला असला तरी मुंबईकर काँग्रेस पक्षालाच मतदान करतील व मुंबई महानगरपालिकेवर काँग्रेस पक्ष मॅजिक फिगर गाठेल, असा विश्वास मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा एकनाथ गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.

खासदार वर्षा गायकवाड यांनी संत रोहिदास मार्ग, काळा किल्ला, धारावी येथे मतदानाचा हक्क बजावला. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, मुंबईकरांना स्वच्छ हवा व पिण्याचे पाणी हवे आहे, वाहतूक कोंडीतून मुक्तता हवी आहे, चांगल्या वैद्यकीय सोयीसुविधा, चांगले व दर्जेदार शिक्षण हवे आहे आणि महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराला आळा घालायचा आहे. भाजपा महायुतीच्या भ्रष्ट कारभाराला मुंबईकर कंटाळला असून त्यांना विवाद नको आहे तर विकास हवा आहे. काँग्रेस आघाडीला मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला असून महानगरपालिकेवर काँग्रेसची विजयी पताका फडकेल, असे खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या..

निवडणुकीत भाजपा महायुतीने सत्तेचा गैरवापर मोठ्या प्रमाणावर केला तर दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभाराचा फटका बसला. आधीच मतदार याद्यांत घोळ घातले ते शेवटपर्यंत सोडवता आले नाहीत. आता पाडू मशीन वापरली जात आहे, त्याबद्दल आयोगाने राजकीय पक्षांना काहीच माहिती दिली नाही. मतदारांच्या बोटाला लावलेली शाई पुसली जाते, अशा अनेक तक्रारी आल्या पण निवडणूक आयोग ढिम्म आहे. अशा पद्धतीने निवडणूका घेऊन लोकशाहीचे वस्त्रहरण केले जात आहे हे देशासाठी घातक आहे, असे खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *