खुर्चीचा मोह नाही, जनतेचा विश्वास हाच खरा मुकुट!

0
657e9d3e-b1b0-4b57-b818-fa2771056718

खुर्चीचा मोह नाही, जनतेचा विश्वास हाच खरा मुकुट!

अमरावती, दि १३ जानेवारी :

शिवसेना सत्तेसाठी नाही तर सर्वसामान्यांच्या वेदना दूर करण्यासाठी जन्माला आली आहे. मालमत्तेच्या आकड्यांपेक्षा माणसांची नाती आणि लोकांचा विश्वास महत्त्वाचा आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेनेचे पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमरावतीत रणशिंग फुंकले. नेहरू मैदानावर झालेल्या जाहीर प्रचारसभेत त्यांनी विकास, महिला सशक्तीकरण, मूलभूत सुविधांचा अभाव आणि विरोधकांच्या अपयशावर जोरदार हल्लाबोल करत, “जे बोलतो ते करतो, कमी बोलतो पण जास्त काम करतो,” असा ठाम विश्वास दिला.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरातील नेहरू मैदानावर शिवसेनेची जाहीर प्रचारसभा मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेला लाडक्या बहिणीचा लाडक्या भावांची विशेष गर्दी होती. संबोधित करताना एकनाथ शिंदे यांनी अमरावतीच्या विकासासाठी ठोस रोडमॅप मांडत, येत्या १५ तारखेला धनुष्यबाणासमोरील बटण दाबण्याचे आवाहन केले.

“लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, हा तुमच्या भावाचा शब्द आहे,” असे ठाम सांगत त्यांनी विरोधकांवर टीका केली. कोर्टात अडथळे आणले गेले तरी महिलांच्या ताकदीमुळेच महायुतीला प्रचंड यश मिळाले. महिलांचा पाठिंबा म्हणजे विजयाची खात्री,” असे सांगत नगरपरिषद, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांतील अनुभव त्यांनी मांडला.

सभेला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ, माजी मंत्री जगदीश गुप्ता, जलसंधारण मंत्री संजय राठोड, ज्ञानेश्वर धाने पाटील, माजी आमदार संजय रायमुलकर, प्रियांका विश्वकर्मा, यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडीच्या प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *