FB_IMG_1768015943687

आज जर चुकलात तर मुकलात !

मुंबई, दि. १२ जानेवारी २०२६,

ही मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक आहे. आज जर चुकलात तर मुकलात म्हणून समजा. माझं इतर पक्षांतील मराठी माणसांनाही आवाहन आहे. सोडा ते सगळं मराठीसाठी एक व्हा, महाराष्ट्रासाठी एक व्हा. ही मुंबई, हा महाराष्ट्र मराठी माणसाच्या हातात रहावा, तुमच्या हक्काचं असावं तुमचंच आहे ते. जो लढा आजवर मराठा साम्राज्याने दिला तो लढा आता आपल्याला उभा करायचाय. हा महाराष्ट्र वाचवायचाय, महाराष्ट्र समृद्ध करायचाय, ही मुंबई आपल्याला वायचायचीये यासाठी आपण कामाला लागा, असे राज ठाकरे यांनी आवाहन केले.

शिवाजी पार्क वरील सभेत बोलताना राज ठाकरे यांनी तुफानी हल्ला करत भाजपाची पिसं काढली. ते म्हणाले, मी आणि उद्धव आम्ही एकत्र येण्याचं मूळ कारण म्हणजे या मुंबईवर आलेलं संकट. अकोटमध्ये भाजपने एमआयएमसोबत युती केली. बदलापुरात भाजपने काँग्रेससोबत युती केली. भाजपचे ६६ जण बिनविरोध निवडून आले म्हणजे ६६ ठिकाणी मतदार मतदान करू शकत नाहीत. तुळजापूरात ड्रग्ज रॅकेट मधला आरोपी विनोद गंगणेला भाजपने तिकीट दिलं. बदलापुरातील बलात्काराच्या प्रकरणातील सह-आरोपी तुषार आपटेला नगरसेवक केलं. ही हिंमत भाजपमध्ये आली कुठून? सध्या महाराष्ट्रात जे काही सुरू आहे त्याचं चित्र पाहून तुम्हाला भीती वाटली नाही तर निवडणुका न लढवलेल्याच बऱ्या.

 

राज ठाकरे पुढे म्हणाले, जगामध्ये अदानींप्रमाणे १० वर्षांत इतक्या मोठ्या प्रमाणात श्रीमंत झालेला दुसरा माणूस नसेल. सरकारची एकट्या अदानींवर इतकी मेहरबानी का? वाढवणला बंदर येतंय ठीक आहे. पण विमानतळ कशासाठी तर, सगळे कार्गो वाढवणला नेणार आणि मुंबई विमानतळावरची सगळी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणं नवी मुंबईत हलवणार आणि नंतर मुंबई विमानतळाची जमीन विकायला काढणार.

 

आधीपासून त्यांच्या डोक्यात आहे मुंबई गुजरातला न्यायची. त्यासाठी पालघरचा जिल्हा ताब्यात घ्यावा लागेल, ठाणे जिल्हा आणि एमएमआर परिसराचा भाग ताब्यात घ्यावा लागेल आणि नंतर मुंबई गुजरातला जोडून घेणं सोपं होईल. एकदा मुंबई हातातून गेली तर महाराष्ट्र झारखंडपेक्षा वेगळा करणार नाहीत हे.

 

देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी भुजबळांना जेलमध्ये टाकलं होतं. अजित पवारांविरोधात बैलगाडीभरून पुरावे फडणवीसांनी सादर केले आणि आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसलेत. आणि आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करताय?

 

उत्तर भारतातला एक माणूस बोलला, मुंबई महापालिकेत नोकऱ्या द्यायच्या असतील तर इथल्या उत्तर भारतीयांना दिल्या पाहिजेत, बाहेरून कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातून येणाऱ्यांना कशाला द्यायच्या. आमच्या कोल्हापूर, सातारा, सांगलीतून येणारी लोकं बाहेरची झाली? तुम्ही मराठी म्हणून एकत्र येता कामा नये म्हणून यांचा हा खेळ सुरू आहे.

मराठी माणसाला एकटं पाडण्यासाठी हा डाव रचला जातोय. पण एकटे असलो तरी बास आहोत. माझा कोणत्याही भाषेला विरोध नाही पण तुम्ही आमच्यावर लादणार असाल तर लाथच मारू असा इशारा राज ठाकरेंनी दिला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *