Ads

--

भाजपा महायुतीचा जाहीरनामा नव्हे ‘फेकूनामा’..

By Xtralarge News

January 12, 2026 10:46 pm

Ads

भाजपा महायुतीचा जाहीरनामा नव्हे ‘फेकूनामा’..

मुंबई, दि. १२ जानेवारी ;

मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीवर दरोडा टाकणाऱ्या भारतीय जनता पक्ष महायुतीचया जाहिरनाम्यात दिलेला एकही शब्द ते पाळणार नाहीत. महापालिकेतील ९० हजार कोटींच्या बँक ठेवी लुटून खाणारे, मुंबईतील महत्वाच्या ठिकाणची हजारो एकर जमीन लाडक्या उद्योगपतीच्या घशात घालणारे, बेस्टचे खाजगीकरण करणारे भाजपा शिंदेसेना मुंबईकरांचा विकास करणार नाहीत. भाजपा महायुतीचा जाहीरनामा नाही तर तो ‘फेकूनामा’ आहे, अशी घणाघाती टीका मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

भाजपा महायुतीचा समाचार घेत खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मुंबई महानगरपालिकेत भाजपा शिवसेना युतीची २५ वर्ष सत्ता होती, मागील ३ वर्ष ९ महिने प्रशासकाच्या मदतीने मुंबई महापालिकेचा कारभार मंत्रालयातून सुरु आहे. सर्व फाईल्स नियमबाह्य पद्धतीने मंत्रालयातून मंजूर केल्या जात आहेत. प्रत्येक विभागात भ्रष्टाचार बोकाळला आहे, आम्ही त्यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल सातत्याने केलेली आहे. सीटीफ्लो सारख्या खाजगी बसेस नियमबाह्य पद्धतीने मुंबई व एमएमआरडीए भागात खुलेआम धावत आहेत. बेस्ट बसला मोडीत काढण्याचे षडयंत्र आहे तर महापालिकेच्या शाळाही खाजगी संस्थांना दिल्या जात आहेत. पिण्याचे स्वच्छ व पुरेसे पाणी मिळत नाही. आरोग्य सेवांचा बोजवारा उडाला आहे. पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई होते. मिठी नदीच्या गाळातही भ्रष्टाचार केला आहे. विरोधी पक्षाच्या वार्डात एक पैशाचाही निधी दिलेला नसून सत्ताधारी पक्षाने स्वतःच्या वार्डात मात्र भाजपा शिंदेसेनेच्या घरचा पैसा असल्यासारखा वाटला आहे.

मुंबईतील ३ ते ४ हजार एकर जमीन अदानीला किरकोळ भावाने व सर्व नियम बदलून दिल्या आहेत. धारावीकरांना धारावीतून हाकलून लावण्याचे षडयंत्र आहे, कोळीवाड्यांवर भाजपाची वाकडी नजर आहे, एसआरएच्या नावाखाली महत्वाचे भूखंड बगलबच्च्यांनी दिले आहेत. भाजपा महायुतीने मुंबई विकण्याचा सपाटा लावला असून मुंबईच्या प्रश्नावर न बोलता धार्मिक वातावरण बिघडवण्याचे काम भाजपा करत आहे. भाजपा महायुतीच्या भुलथापांना बळी पडू नका, असे आवाहन खासदार वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांचा धडाकेबाज प्रचार सुरु आहे. प्रत्येक वार्डाला भेट देऊन स्थानिक जनतेशी थेय संवाद साधत, पदयात्रा, रॅली, चौकसभा घेण्यावर त्यांचा भर आहे. स्थानिक प्रश्न, मूलभूत सुविधा आणि सर्वसमावेशक विकासाच्या मुद्द्यांवर बोलत, जनतेच्या विश्वासावर चालणारी, संवेदनशील आणि जबाबदार महानगरपालिका घडवण्याचा निर्धार व्यक्त करत काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन खासदार वर्षा गायकवाड करत आहेत.

No comments to show.

Leave a Comment