BMC तील कारभारावर काँग्रेसचे प्रदर्शन..
BMC तील कारभारावर काँग्रेसचे प्रदर्शन..
मुंबई, दि. १ जानेवारी ..
भ्रष्ट महायुतीने मुंबई महानगरपालिकेत बट्याबोळ करून ठेवला आहे. मागील तीन वर्षात मुंबईकरांच्या पैशांची लुट केली असून सुविधा मात्र काहीच दिल्या नाहीत. २०१७ ते २२ या कालावधीतील मुंबई महानगरपालिकेची कामगिरी केवळ ३८ % इतकीच आहे. मुंबईकरांना नगररचना, प्रशासन आणि नागरी सुविधा देण्यात भ्रष्टयुती अपयशी ठरली आहे.मुंबई महानगरपालिकेला लागलेली महायुतीची कीड समूळ नष्ट करून मुंबईला एक पारदर्शक प्रशासन देण्यास काँग्रेस वचनबद्ध आहे, असे आश्वासन मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार प्रा. वर्षा एकनाथ गायकवाड यांनी दिले आहे.
मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्ट युतीच्या कारभारावर प्रहार करणाऱ्या प्रदर्शनाचे उद्घाटन मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार प्रा. वर्षा एकनाथ गायकवाड यांच्या हस्ते राजीव गांधी भवन येथे करण्यात आले. यावेळी माजी मंत्री आमदार अस्लम शेख, मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सुरशेचंद्र राजहंस व वरिष्ठ नेते उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार वर्षा एकनाथ गायकवाड म्हणाल्या की, भ्रष्टयुतीच्या हातात मुंबई आणि मुंबई महानगरपालिका असुरक्षित आहे.मुंबई महानगर पालिकेच्या मुदत ठेवीत मागील तीन वर्षात १२ हजार कोटींची घट झाली आहे. मुंबई हवा प्रदूषणात प्रथम क्रमांकावर आहे, बांधकामातील धूळ वाढून प्रदूषण होत असून त्याचा सामान्य मुंबईकरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. मुंबईकरांची जीवनवाहिनी बेस्ट तोट्यात आहे आणि प्रवाशांवर भाडेवाढीचा बोजा टाकून आर्थिक लूट सुरु आहे, भाडेवाढ दप्पट केली आहे. सार्वजनिक वाहतूक कमकुवत करून बेस्ट डेपोंच्या जागांचे खाजगीकरण करण्याचा डाव आहे. मिठी नदी मध्ये कोट्यवधी रुपयांचा गाळ घोटाळा केला आहे. बनावट MoU करून कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांनी दरोडा टाकला आहे. मुंबईकरांची लूट थाबंली पाहिजे, त्यासाठी या भ्रष्ट महायुतीला सत्तेतून खाली खेचा, असे खासदार गायकवाड म्हणाल्या.
खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, मुंबई महानगर पालिकेत काँग्रेसची सत्ता आल्यास ‘बेस्ट’च्या ताफ्यात ६,००० पेक्षा जास्त बसेस आणणार, प्रत्येक मुंबईकराला ‘Universal Free Health Card’ आणि मोफत औषधे देणार, बंद पडलेल्या मराठी शाळा पुन्हा सुरू करून त्यांचे नूतनीकरण करणार. मुंबईचा पाणीपुरवठा ५,००० दशलक्ष लिटरपर्यंत वाढवणार. ‘पथविक्रेता अधिनियम २०१४’ ची प्रभावी अंमलबजावणी करून ‘फेरीवाला मुक्त क्षेत्र’ निश्चित करणार. बांधकामामुळे होणाऱ्या प्रदूषणावर कडक निर्बंध लावणार. चांगल्या मुंबईसाठी आणि मुंबईकरांच्या हक्कासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे. पुढील आठवड्यात काँग्रेस आणि आघाडीतील मित्र पक्ष जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहोत, असेही खासदार गायकवाड म्हणाल्या.
