हर्षवर्धन सपकाळांना हलक्यात घेऊ नका..
‘वंचित’ व ‘रासप’ बरोबर काँग्रेसची आघाडी एक मोठी राजकीय खेळी…
मुंबई, दि. २९ डिसेंबर २०२५;
महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. प्रत्येक पक्ष आघाडी करण्यात व्यस्त आहे. सगळीकडे एकच बोलबाला आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्षाचा व चर्चा आहे ती ठाकरे बंधू व पवार काका पुतण्याची, पण या वातावरणात एक मोठी राजकीय घडामोड राज्यात झाली आहे आणि ती म्हणजे ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी व काँग्रेस पक्षाची झालेली आघाडी…ही आघाडी मुंबई महानगरपालिकेसाठी झाली असून इतर जिल्ह्यात स्थानिक नेतृत्व निर्णय घेईल असे ठरले आहे. यात महत्वाची व उल्लेखनीय बाब अशी आहे की, काँग्रेस पक्षाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला वंचित बरोबर आघाडी करून मोठा झटका दिलेला आहे.

मागील काही वर्षात महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष म्हणजे शरद पवार सांगतील तशीच आघाडी करेल वा निर्णय घेईल अशी प्रतिमा बनवली गेली होती तसेच २०१९ नंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या छायेखालीच काँग्रेस पक्ष काम करत आहे असे चित्र रंगवले गेले होते. संजय राऊत व काही नेतेतर जाहीरपणे राज्यातील नेत्यांना कोण विचारतो, आम्ही थेट दिल्लीलाच विचारतो, अशी शेखी मिरवत होते व काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांचा पाणउतारा करत होते.

काँग्रेस पक्षाचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे तसे महाराष्ट्राच्या राजकारणात नवखेच नाव आहे. अनेकजण त्यांना फारच हलक्यात घेतात पण हा माणूस काय आहे, याची चूणूक त्यांनी नगरपालिका निवडणुका व आता वंचित बरोबर आघाडी करून दाखवून दिले आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबरच महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाबरोबरही आघाडी करून दुसरी मोठी राजकीय खेळी केली आहे. या जोडीला पुण्यातील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना काँग्रेस पक्षात घेऊन आणखी एक धक्का दिला आहे. या दोन तीन निर्णयाने हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेस पक्षाची वाटचाल कोणत्या दिशेने आहे हे दाखवून दिले आहे. या आघाडीतून आताच्या निवडणुकीत किती विजय मिळेल, किती जागा जिंकून येतील यापेक्षा वंचित व रासप बरोबर आघाडीचा निर्णय घेऊन सपकाळ यांनी २०२९ ची मांडणी केलेली आहे. दलित, धनगर, मराठा, ओबीसी समाजाला बरोबर घेऊन महाराष्ट्रात एक मोठी ताकद निर्माण करण्याची पायाभरणी सपकाळ यांनी केलेली आहे. अल्पसंख्याक समाज काँग्रेस पक्षाबरोबर आहेच, त्यासोबत आता ही मोट बांधल्याने महाराष्ट्रात एक मोठे सोशल इंजिनिअरिंग सपकाळ यांनी करून दाखवले आहे. ही राजकीय चाल खेळून हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्या छायेतून काँग्रेस पक्षाला बाहेर काढले आहे. याचा मोठा फायदा काँग्रेस पक्षाला आगामी काळात होईल यात तिळमात्र शंका नाही.
हर्षवर्धन सपकाळ यांनी अत्यंत शांतपणे आणि पद्धतशीर या आघाड्या केल्या आहेत. या आघाडीचे राजकारण ही काळाची गरज आहे व काँग्रेसला पुन्हा महाराष्ट्रात पूर्वीचे दिवस आणून देण्याच्या योजनेचा एक भाग आहे. वंचित व रासपला बरोबर घेऊन सपकाळ यांनी मोठी राजकीय खेळी केली आहे. २०२९ च्या निवडणुकीत त्याचे परिणाम दिसतीलच पण ज्यांना सर्वजण हलक्यात घेत होते ते अत्यंत धूर्त राजकारणी आहेत आणि आगामी काळात ‘डार्क हॉर्स’ म्हणून दिसतील.
