हे सरकार पडावे असे वाटणारे पत्रकार !!!
मुंबई, दि. 2 ऑक्टोबर :
काल पाऊस आला म्हणून चौकात थांबलो तेथे ओळखीचे काहीजण बसले होते, मला पाहताच या संपादक साहेब ( सर्वसामान्य लोकांना माध्यमातील दोनच पदे माहिती असतात, फिल्डवर काम करणारे सगळे पत्रकार, आॅफीसमध्ये काम करणारे सगळे संपादक ), जवळ गेलो तर थेट एकाने दमातच विचारले, काय राव पत्रकारांना महाविकास आघाडी सरकार आवडत नाही का? नाही जो तो उठतो तो सरकार पडणार सरकार पडणार असे केकाटत असतो. पत्रकार कधी सरकार पाडू शकतात का भावा, असे त्याला सांगितले. त्यांचा रागरंग पाहता तेथे जास्तवेळ थांबणे हिताचे नाही हे ओळखून मी तेथून कलटी मारली वाटेत बराच वेळ हाच विचार करत होतो की खरंच तो म्हणतो ते खरं असेल का.
ज्येष्ठ पत्रकार व शिवसेनेचे खासदार संजय राऊत व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील एका हॉटेलमध्ये भेट झाल्यापासून तर महाविकास आघाडी सरकार पडणार या चर्चेचा ऊत आला आहे. या दोन नेत्यांची भेट होताच वृत्तवाहिन्यांनी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आल्यासारख्या बातम्या, चर्चांचा रतीबच घातला. वर्तमानपत्रांनी पण बातम्या लावून धरल्या. बातम्यांचा कल असा होता की येत्या काही दिवसात सरकार पडणार आणि नवे सरकार येणार. आधी पत्रकार असणा-या व आता ज्योतिषी झालेल्या व्यक्तीने तर फेसबूक लाईव्ह घेवून सगळा उहापोह केला. दुस-या दिवशी स्थानिक दैनिकात त्याचा वृत्तांत देवून नवे सरकार येण्याची १५ आॅक्टोबर ही तारीख देखील जाहीर करून टाकली. भाजप व शिवसेनेकडून अधिकृतरित्या या मुलाखतीबद्दल खुलासा आला तरी पुढील दोन तीन दिवस सरकार पडण्याच्या बातम्या, चर्चा, गप्पा गोष्टी चालूच होत्या.
तर मुळ प्रश्न असा आहे की काही पत्रकारांना हे महाविकास आघाडी सरकार पडावे असे का वाटते. माध्यमांना, त्यात काम करणा-या माध्यमकर्मींना सरकार कोणतेही असो आपण नेहमी सरकारविरोधात सर्वसामान्य जनतेसोबत उभे राहिले पाहिजे असा पत्रकारितेचा साधा नियम आहे. मग असे असताना पत्रकार सरळसरळ एखाद्या पक्षाची, एखाद्या नेत्याची बाजू कसे काय घेवू लागले.
मी 2000 पासून या क्षेत्रात काम करतो. सुरूवातीपासून चांगल्या पदावर चांगल्या ठिकाणी काम केले आहे. आधी कधीच वाटत नव्हते, की हा या बाजूचा किंवा त्या बाजूचा पण २०१२ नंतर मात्र परिस्थिती वेगाने बदलू लागली. काही मित्र, वरिष्ठ वेगळी भाषा बोलू लागले. ठरवून एखाद्याला टार्गेट करू लागले. अहो, सर त्या बातमीत काही दम नाही असे सांगितलेल्या बातम्या देखील रनडाऊनमध्ये अग्रक्रमाने येवू लागल्या. अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचे एकही लाईव्ह फीड वाया जाणार नाही याची काळजी घेतली जावू लागली.
२०१४ येता येता देशातील सर्वात मोठ्या संस्थेचा भाग झालो. तेथे देखील सरळसरळ दोन गट पडलेले दिसले. एका गटाला ठरवून बाजूला केल्यासारखे करण्यात आले होते. मग मोदींच्या सभा, त्यांची भाषणे कशी आक्रमक होतील, त्याला स्पेस कसा मिळेल याची काळजी घेण्यात येवू लागली. निवडणूक शेवटच्या टप्प्यात येईपर्यंत तर मोदीविरोधात बोलणे म्हणजे देशद्रोही अशी अवस्था डेस्कवर झाली होती. निकालाच्या दिवशी तर डेस्कवरचे वातावरण एकदम दिवाळी सारखे होते. जसजसा निकाल येवू लागला तसे डेस्कवरची टेबल वाजू लागले. आरडाओरडा वाढत जावून सरते शेवटी लाडू वाटून मोदी सरकार आल्याचा जल्लोष साजरा करण्यात आला. त्यावेळी कळून चुकले की माध्यमातील अनेकांचे दाखवायचे चेहरे एक आहेत. प्रत्यक्षातील चेहरे मात्र वेगळेच आहेत.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत देखील अशीच परिस्थिती शिवसेना- भाजपची युती तुटल्याचा आनंद अनेकांना झाला. आता दाखवतो कोण किती पाण्यात आहे अशी भाषा. अरे आपण पत्रकार आहोत की कार्यकर्ते. हेच कळेना. झाले आम्हीपण कारण नसताना एका पक्षाचे कार्यकर्ते झालो. आता झालो तर झालो. चला मग ते त्यांची बाजू घेतातना मग आम्ही यांची बाजू घेवू लागलो. राज्यात नवे सरकार आले. नव्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या जवळ एक पत्रकारिता केलेला व्यक्ती ठेवला. त्यानंतर पाच वर्षे काय काय झाले हे आपण पाहिले आहेच. त्या पाच वर्षात झालेली पेरणीच आज महाविकास आघाडी सरकार पडावे यासाठी वापरली जाते. काही आघाडीची माध्यमे, वर्तमानपत्रे ठरवून बातम्या लावतात. ठरवून अजेंडा सेट केला जातो. अनेक बातम्यांचा वाचकांशी संबंध देखील नसतो तरी चिटवल्या जातात.
महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून काही पत्रकारांना आपला घरचा व्यक्ती यापदापासून मुकला आहे याची खंत लागून राहिली आहे. यासाठी ते वाटेल ते करत आहेत. महाविकास आघाडीच्या प्रत्येक मंत्र्यांकडून काही तरी चूक व्हावी आणि आपण त्यांना धारेवर धरावे याची वाट पाहत असतात. जे माध्यमात छापले जावू शकत नाही. टीव्हीवर दाखवले जावू शकत नाही. ते सोशल मीडियावर टाकून आपला अजेंडा चालवला जात आहे. दररोज रात्री सरकारविरोधात नवा हॅशटॅग वापरून शो, विरोधी पक्ष नेते फडणवीस यांची प्रत्येक बातमी मोठ्या स्वरुपात. गेल्या पाच वर्षात विरोधी पक्ष नेते कोण होते. त्यांना माध्यमे किती कव्हरेज द्यायची. आताच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा विरोधी पक्ष नेत्यांना जास्त स्पेस व टाईम मिळतो. मुख्यमंत्री लोणचे लावल्यासारखे कधी तर दाखवतात.
खडसे यांनी केलेल्या गंभीर आरोपापेक्षा माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी व पोपटाला जास्त जागा मिळते. यावरून जनता अंदाज लावू शकते की काही पत्रकारांच्या मनात आजही मुख्यमंत्री कोण आहेत. आणि हे सरकार पडण्यासाठी का एवढा आटापिटा केला जात आहे. आता हे पत्रकार कोण हे राज्यातील तमाम जनतेला माहीत झाले आहे. ते आता नावानिशी आपल्या भागातील कोणता पत्रकार कोणत्या बाजूचा आहे हे सांगू शकतात. बातमी ही सर्वसामान्य जनतेला माहिती देणारी असावे असे आम्हाला शिकलले होते. पण आता माहिती देण्यापेक्षा जनतेचे मत बनवणारी झाली आहेत. आणि हे जनतेला काही कळत नाही अशा भ्रमात अनेकजण आहेत. त्यांना हे माहीत नाही की जनतेला हे सगळं समजत आहे. म्हणून तर लोक कोणत्याही पत्रकाराला त्याचा दर विचारू लागले आहेत. काय कितीचे पाकीट आले, असे बिनधास्त बोलू लागले आहेत.
गेल्या पाच सहावर्षांत माध्यमांनी आपली विश्वसनीयता एवढी घालवली आहे की त्यांची अवस्था त्या मेंढपाळ मुलासारखी झालीय. आता खरोखरचा लांडगा आला, सरकार पडले तरी तुमच्या बातम्यांवर कोणीही विश्वास ठेवणार नाही आणि हे पटत नसेल तर आपल्या प्रेक्षकांचे खरे आकडे, वृत्तपत्रांचे प्रिंटींगचे खरे आकडे बघा आणि स्वत:चे स्वताला विचारा की विश्वसनीयता शिल्लक आहे का ???
