20251224_202458

शिवसेना मनसे युतीवर शिक्कामोर्तब..

मुंबई, दि. २४ डिसेंबर २०२५ :

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना, या दोन पक्षांची आगामी महापालिका निवडणुकांसाठीची युती घोषित झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या युतीची अधिकृत घोषणा संयुक्त पत्रकार परिषदेत केली.

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ही युती बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित होती आणि या सगळ्याची सुरुवात, मी एका मुलाखतीत दिलेल्या वाक्यातून झाली. “कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणांपेक्षा आपला महाराष्ट्र आणि मराठी माणूस मोठा आहे”, हे माझं वाक्य होतं. हे निव्वळ मुलाखतीतलं वाक्य नाहीये, तर ही तीव्र भावना आहे.

आणि यातूनच हे २ पक्ष एकत्र आले आहेत. बाकी युतीची घोषणा झाली. आता कोणाला कुठल्या आणि किती जागा मिळणार याची उत्तरं लवकरच मिळतील. त्यावर आजच्या व्यासपीठावर कुठलीही माहिती सांगितली नाही, कारण त्या तांत्रिक बाबी आहेत.

युती ही किती जागा, कुठल्या जागा यासाठी नाहीये. ती आज मराठी माणसाचं मुंबई आणि परिसर पण उद्या राज्याच्या इतर भागातून अस्तित्व मिटवण्याचा जो प्रयत्न सुरु आहे, त्या शक्तींना गाडून टाकण्यासाठीची ही युती आहे. त्यामुळे जागावाटप आणि त्याचा तपशील योग्य वेळी संबंधित व्यक्ती घोषित करतील. मुंबईचा महापौर हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचा असेल आणि तो निर्विवादपणे मराठीच असेल, असे राज ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *