पर्यावरण संवर्धनासाठी ‘माझी वसुंधरा’ अभियान!
मुंबई, दि. २ ऑक्टोबर :
राज्यातील पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करणे, याकामी लोकांचा सहभाग वाढविणे, निसर्गाशी संबंधीत पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांचे संरक्षण करणे या अनुषंगाने ‘माझी वसुंधरा’ अभियानाचा आज राज्याचे पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. पहिल्या टप्प्यात राज्यातील ३९५ शहरे आणि ३३९ मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे. उत्कृष्ट काम करणारी ३ अमृत शहरे, ३ महापालिका, ३ नगरपंचायती आणि ३ ग्रामपंचायतींना ५ जून या जागतिक पर्यावरण दिनी पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल, अशी घोषणा यावेळी मंत्री ठाकरे यांनी केली.
अभियानात राज्यात उत्कृष्ट काम करणारे विभागीय आयुक्त, ३ जिल्हाधिकारी आणि ३ जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहरी आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. आज महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून मंत्री ठाकरे यांनी मंत्रालयातून अभियानाचा ई-शुभारंभ केला. ३१ मार्चपर्यंत अभियानाचा कालावधी असेल.
आदित्य ठाकरे म्हणाले की, आपल्याला पुढच्या पिढीला चांगली पृथ्वी द्यायची असेल तर निसर्गाशी संबंधीत पंचतत्वांबरोबर आपण कसे जगू याचा विचार करावा लागेल. वातावरणाचा पॅटर्न बदलत आहे. पुर्वी निश्चित वेळी येणारा पाऊस आता अवेळी येत आहे. २०१२ पासून आपण दुष्काळाचा सामना केला, पण मागील २-३ वर्षापासून अतिवृष्टीचा सामना करत आहोत. निसर्ग वादळ, ढगफुटीसारखी संकटे वाढली आहेत. किंबहुना कोरोनासारखी संकटे हेसुद्धा वातावरणातील बदलाचाच परिणाम असल्याचे दिसते. हे रोखण्यासाठी पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करण्याला पर्याय नाही. इलेक्ट्रिक बसेस, इलेक्ट्रिक रिक्षांचा वापर, अपारंपारिक उर्जा स्त्रोतांचा वापर, कार्यालयांमध्ये उर्जा, पाणी यांच्या वापराचे लेखापरिक्षण करणे, कार्बन फुटप्रींटस् कमी करणे अशा अनेक उपाययोजना आपल्याला कराव्या लागतील. माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाच्या या चळवळीला गती देण्यात यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले की, पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांचे संरक्षण करणे ही फार चांगली संकल्पना आहे. निसर्गाशी संबंधीत सर्व घटकांचा यात समावेश होतो. आपली भारतीय संस्कृती नेहमीचे पंचतत्वांचे संरक्षण करत आली आहे. यापुढील काळातही या दिशेने आपण वाटचाल केल्यास आपण जगाला दिशा देऊ शकू. माझी वसुंधरा अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्यासह लोकांनी पुढाकार घेऊन हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
