BMC साठी काँग्रेस शरदचंद्र पवार NCP आघाडी ?
BMC साठी काँग्रेस शरदचंद्र पवार NCP आघाडी ?
मुंबई, दि. १९ नोव्हेंबर …
मुंबई महानगरपालिका निवडणूक लोकशाही व संविधान माननाऱ्या पक्षांशी आघाडी करुन लढवण्याचा काँग्रेस पक्षाचा प्रयत्न आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नैसर्गिक आघाडी असून दोन्ही पक्ष लोकशाही व संविधानवादी आहेत. आघाडीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी चर्चा सुरु असून लवकरच त्यासंदर्भातील निर्णय होईल, असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याशी मुंबई काँग्रेसच्या नेत्यांची आज सिल्व्हर ओकवर जाऊन भेट घेतली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.
या शिष्टमंडळात मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, माजी मंत्री आमदार अस्लम शेख, आमदार अमीन पटेल, आमदार ज्योती गायकवाड, जिल्हा अध्यक्ष रवि बावकर आदी उपस्थित होते.
बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, आजच्या बैठकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आघाडी व्हावी अशी काँग्रेसची अपेक्षा आहे, त्यांच्या पक्षाच्या मुंबई अध्यक्ष राखी जाधव व इतर नेत्यांशी चर्चा झालेली आहे. लवकरच दोन्ही पक्षातील नेत्यांची बैठक घेऊन त्यानंतर आघाडीसंदर्भातील निर्णय होईल.
आघाडीत मनसेच्या सहभागासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना खा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काही दिवसापूर्वीच निवडणुकीत स्वबळावर जाऊ अशी भूमिका मांडली होती. उद्धव व राज ठाकरे दोन भाऊ एकत्र आले तर त्याचे स्वागतच आहे पण त्याबाबत काँग्रेसशी काहीही चर्चा झालेली नाही. काँग्रेसने जेव्हा कोणत्या पक्षाशी आघाडी केली तेव्हा किमान समान कार्यक्रमाच्या आधारे केलेली आहे. बीएमसी निवडणूक समविचारी पक्षांना बरोबर घेऊन लढली पाहिजे असा काँग्रेसचा विचार आहे. मुंबईत देशाच्या सर्व भागातील लोक राहतात, मुंबईच्या विकासात सर्वांचे योगदान आहे. कायदा हातात घेणारे, दडपशाही करणाऱ्यांबरोबर काँग्रेस पक्ष जाऊ शकत नाही. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून लोकाना जोडण्याचे, प्रेम देण्याचे काम केले आहे असे खासदार गायकवाड म्हणाल्या..
महानगरपालिकेची निवडणूक ही मुंबईच्या प्रश्नावर झाली पाहिजे. जात, प्रांत, भाषा आणि धर्म यावर न होता मुंबईकरांचे प्रश्न महत्वाचे आहेत. मुंबईत प्रदुषणाची मोठी समस्या आहे, रस्त्यावरील खड्डे, वाहतूक कोंडी, पाणी पुरवठा, आरोग्य सेवा, शिक्षण बीएमसी मधील भ्रष्टाचार हे मुद्दे आहेत त्यावर आवाज उठवला जाईल असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.
