IMG-20251102-WA0022

वारकऱ्यांची सेवा हीच मोठी साधना

पंढरपूर, दि. ३ नोव्हेंबर :

वारकरी परंपरा ही आपल्या धर्म-संस्कृतीची पताका अभिमानाने उंचावणारी आहे. वारकऱ्यांची सेवा करणे ही मोठी साधना मानून त्यांच्यासाठी शक्य ते सर्व करू, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात केले.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) ‘कार्तिकीची वारी पंढरीच्या दारी’ या उपक्रमाचा समारोपानंतर ते पत्रकारांशी संवाद साधत होते. शिंदे म्हणाले, “पांडुरंगाने महाराष्ट्रातील जनतेचे व शेतकऱ्यांचे दु:ख दूर करावे अशी प्रार्थना केली आहे. पंढरपूरात लाखो वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी स्वच्छता, शुध्द पाणी, चंद्रभागेत स्नानगृह, मोबाईल टॉयलेट्स, आयसीयू सुविधा असे सर्वसमावेशक नियोजन केले आहे. प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, पालकमंत्री, आमदार आणि सर्व लोकप्रतिनिधी यांचे मनापासून अभिनंदन करतो.”

ते पुढे म्हणाले, “वारकऱ्यांना नागरी सुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही आषाढीपूर्वीच नियोजन केले. आम्ही वारकरी व शेतकरी कुटुंबातून आलो आहोत. पंढरीत आल्यावर जुन्या आठवणी जाग्या होतात.”

 

शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार..

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी महायुती सरकार ठामपणे उभे असल्याचे शिंदे यांनी सांगितले. गेल्या वर्षी शेतकऱ्यांना 45 हजार कोटी वाटले, तर यंदा 32 हजार कोटींची मदत केली जात आहे. शेतकरी सहाय्यात कोणत्याही अटी-शर्ती आड येऊ दिल्या नाहीत. हे फक्त महायुती सरकारच करू शकते,” असे ते म्हणाले.

पर्यावरण संरक्षणासाठी बांबू लागवड.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला बांबूचे महत्त्व पटवून दिले. बांबू मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देतो व कार्बन डाय-ऑक्साइड शोषतो. पंढरपूर परिसरात दहा हजार हेक्टरवर बांबू लागवड केली आहे. राज्यात एक लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड पूर्ण केली असून सरकार अनुदान देत आहे. पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे. एमपीसीबीचा ‘पर्यावरणाची वारी पांडुरंगाच्या दारी’ हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत शिंदे यांनी व्यक्त केले.

यावेळी ग्रामविकास मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, गृहराज्यमंत्री योगेश कदम, माजी मंत्री तानाजी सावंत, आमदार समाधान अवताडे, आमदार अभिजित पाटील, आमदार राजू खरे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मेंबर सेक्रेटरी देवेंद्र सिंह आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *