मोदिज मिशन’चे धडे शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करा.
‘मोदिज मिशन’चे धडे शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करा.
मुंबई, दि. २६ ऑक्टोबर;
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘मोदिज मिशन’ हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे आणि संग्रहित ठेवावे. भविष्यात जेव्हा भारताचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा मोदींचा करिष्मा काय होता हे सर्वांना कळेल. या पुस्तकातील काही भाग शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करायला हवा,” अशी सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली. “या पुस्तकातून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळेल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या उपस्थितीत लेखक बर्जिस देसाई यांनी लिहिलेले ‘मोदिज मिशन’ या पुस्तकाचे प्रकाशन राजभवन येथे पार पडले. या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस, बर्जिस देसाई, मंत्री, खासदार, आमदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, “भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर यापूर्वी अनेक पुस्तके आणि चित्रपट आले आहेत. मात्र ‘मोदिज मिशन’ हे केवळ चरित्र नसून त्यांच्या कार्याचा, दृष्टिकोनाचा आणि संघर्षाचा सत्यदर्शी आलेख आहे. मोदींचे व्यक्तिमत्व एका पुस्तकात सामावणे अशक्य आहे. मोदी हे नाव देशाचे वर्तमान आणि भविष्य दोन्ही आहे.”
“मिशन इम्पॉसिबल हा चित्रपट आला, पण नरेंद्र मोदींनी गेल्या अकरा वर्षांत खरोखरच ‘इम्पॉसिबल’ काम शक्य करून दाखवले आहे. या काळात देशात झालेला बदल हा सकारात्मक आणि व्यावहारिक आहे. आज जग भारताकडे आदराने पाहत आहे,” असेही शिंदे म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “मोदींवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार आहेत, आईचे आशीर्वाद आहेत, आणि कामाप्रती डेडिकेशन व डिवोशन ही त्यांची ओळख आहे. मेहनतीचे दुसरे नाव म्हणजे नरेंद्र मोदी.” फेक नॅरेटिव्ह पसरवणाऱ्या वातावरणात सत्य मांडण्याचे धाडस दाखवल्याबद्दल शिंदे यांनी बर्जिस देसाई यांचे कौतुक केले. “गुजरातच्या वडनगरमधून देशाला असा हिरा लाभला, ज्याने करोडो कष्टकऱ्यांचे जीवन उजळून टाकले आहे,” असे ते म्हणाले.
देसाई यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मोदींना तीन वाटा खुल्या होत्या. रामकृष्ण मिशनचे साधू बनणे, सैन्यात जाणे किंवा संघाचे प्रचारक बनणे. “देशाचे भाग्य एवढे चांगले की ते संघाचे प्रचारक झाले आणि आज देशाचे प्रधानमंत्री आहेत. संत झाले नाहीत, पण राममंदिर उभारले; सैन्यात गेले नाहीत, पण पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरने धडा शिकवला,” असे शिंदे म्हणाले.
“आज भारताची अर्थव्यवस्था जगात 11 व्या स्थानावरून चौथ्या स्थानी आली आहे आणि लवकरच ती तिसऱ्या स्थानावर पोहोचेल. हे मोदींमुळेच शक्य झाले आहे. डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत यांद्वारे भारताचा डंका जगभर वाजत आहे,” असेही शिंदे यांनी नमूद केले.
