विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा उडवणार …
विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा उडवणार …
ठाणे, दि. २० ऑक्टोबर :
विरोधकांनी आता कितीही लवंग्या-सुरसुरी फोडल्या, तरी आम्ही त्याकडे पाहतही नाही. कारण महायुतीकडे ॲटम बॉम्ब आहे आणि तो फुटला की विरोधकांचं राजकीय अस्तित्व उडून जाईल, असा स्फोटक इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात दिला.
एकनाथ शिंदे म्हणाले, . महायुतीसोबत महाराष्ट्राची जनता ठामपणे उभी आहे, म्हणूनच आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पूर्ण बहुमताने आमचीच सत्ता येणार. विरोधक दररोज आरोपांची फटाके फोडतात, पण त्यांच्या त्या फुसक्या लवंग्यांचा आमच्यावर काहीच परिणाम होणार नाही! आम्ही कामगिरीच्या ॲटम बॉम्बने महाराष्ट्र उजळवणार आणि विरोधकांचा धुरळा उडवणार आहोत,” असे शिंदेंनी टोला लगावला.
“ठाण्यातील तरुणाईत आज जेवढा उत्साह आणि जल्लोष दिसतोय, तो महाराष्ट्राचं भविष्य आहे. ही परंपरा स्व. आनंद दिघे यांनी रुजवली, आणि आम्ही ती पुढे नेत आहोत,. गोपाळकाला, गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी ठाण्याचा प्रत्येक सण शक्तीचं प्रदर्शन असत. ठाणेकर हे माझं कुटुंब आहे. त्यांच्याच आशीर्वादाने मी मुख्यमंत्री झालो,” असे ते म्हणाले.
शेतकरी संकटात असताना शिवसेना आणि महायुती सरकार त्यांच्यासोबत उभं आहे. आम्ही दिलेलं वचन पाळलं. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदतीचा पैसा पोहोचतोय. या पुरात धाराशिव जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांच्या गाई वाहून गेल्या, त्या शेतकऱ्यांना १०१ दुभत्या गायी देण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे. कारण शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेणं ही आमची संस्कृती आहे,” असे शिंदेंनी सांगितले.
“संकटात धावून जाणं बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांनी शिकवलं आहे. त्यामुळे आम्ही केवळ बोलत नाही, कृती करून दाखवतो!” असा शिंदेंचा ठाम शब्द.“पूर परिस्थितीत केंद्राने मोठी मदत केली. ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्तक्षेपामुळे शक्य झाली,” असे शिंदेंनी सागितले..
“विरोधकांना आता पराभव दिसू लागलाय. म्हणून ते निवडणूक आयोग, ईव्हीएम, महायुती आणि आम्हाला दोष देतात. निवडणुका होऊ शकल्या नाहीत कारण याचिका सुप्रीम कोर्टात होती. त्याला आम्ही जबाबदार नाही,” असे शिंदेंनी स्पष्ट केले. “आता हेच विरोधक ‘निवडणुका घेऊ नका’ अशी विनंती करत आहेत. कारण त्यांना माहिती आहे. निवडणूक झाली तर महायुतीचा ॲटम बॉम्ब थेट त्यांच्या खुर्चीखाली फुटणार!”
