नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे PM मोदींकडून उद्घाटन.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे PM मोदींकडून उद्घाटन.
नवी मुंबई, दि. १० ऑक्टोबर :
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते टच स्क्रीन द्वारे डिजिटल तोरणाने करण्यात आले. त्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी टर्मिनल इमारतीमधील सुविधांसह विमानतळाच्या त्रिमितीय रचनेची पाहणी केली.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन, मुंबई मेट्रो लाईन-३ च्या आचार्य अत्रे चौक ते कफ परेड या अंतिम टप्प्याचे राष्ट्राला अर्पण, ‘मुंबई वन’या देशातील पहिल्या एकात्मिक कॉमन मोबिलिटी अॅपचा शुभारंभ तसेच राज्यातील ४१९ आयटीआय आणि १४१ तांत्रिक संस्थांमध्ये २ हजार ५०६ बॅचेसच्या माध्यमातून नवीन अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमाचा शुभारंभ झाला.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री किंजरापू राममोहन नायडू, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांच्यासह लोकप्रतिनिधी व विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आजचा दिवस केवळ प्रकल्पांच्या उद्घाटनाचा नव्हे, तर भारताच्या झपाट्याने होत असलेल्या परिवर्तनाचे आणि प्रगतीच्या दिशेने घेतलेल्या ठोस पावलांचे प्रतीक आहे. मुंबईतील विविध प्रकल्पांमुळे देशाचा वेग आणि विकास अधोरेखित झाला आहे. पायाभूत सुविधांतील गुंतवणूक, तरुणांसाठी रोजगार संधी हे विकसित भारताच्या दिशेने टाकलेले मजबूत पाऊल असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.
लोकनेते दि. बा. पाटील यांचे काम प्रेरणादायी ..
मराठीतून भाषणाची सुरूवात करून प्रधानमंत्री मोदी यांनी नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राचे पुत्र, लोकनेते दि. बा. पाटील यांनी समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी ज्या सेवाभावी वृत्तीने काम केले ते सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे जीवन समाजसेवेचे काम करणाऱ्यांना नेहमीच प्रेरणा देत राहील, असा दि. बा. पाटील यांचा गौरवपूर्ण उल्लेख प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला.
