बाळासाहेब ठाकरे हे ‘ब्रँड’ होते, हे ब्रँड नाहीत!

0
FB_IMG_1758092709015

बाळासाहेब ठाकरे हे ‘ब्रँड’ होते, हे ब्रँड नाहीत!

मुंबई,  दि. १७ सप्टेंबर २५ ;
भारतीय जनता पक्षामध्ये एक सामान्य कार्यकर्ता हा देखील मुंबई भाजपाचा अध्यक्ष होऊ शकतो, हीच या पक्षाची परंपरा आहे. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. जगातील सर्वात मोठा ब्रँड आमच्याकडे आहे आणि त्यांचे नाव आहे नरेंद्र मोदी असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव व राज ठाकरेंवर हल्ला बोल केला.

NSCI डोम, वरळी, मुंबई येथे भव्य मुंबई भाजपा ‘विजय संकल्प मेळाव्या’ला मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबोधित केले. ते पुढे म्हणाले की, मुंबई कोणाची, याचे उत्तर 2014, 2019 आणि 2024 च्या विधानसभेच्या निकालांनी दिले आहे. मुंबई ही भाजपाची, मुंबई ही भाजप–शिवसेना–महायुतीची! मुंबई महापालिकेला भ्रष्टाचारातून मुक्त करणारा सामान्य कार्यकर्ताच महापौर होणार हे नक्की असे फडणवीस म्हणाले..

गेल्यावेळी मुंबई महानगरपालिकेत भाजपाचा महापौर बनत असताना उद्धव ठाकरेंसाठी एक पाऊल मागे येऊन महापौर पद सोडून दिले. परंतु त्याबदल्यात 2019 च्या विधानसभेला त्यांनी भाजपाला दगा दिला. 2019 ला भाजपाकडून सत्ता हिरावून घेतली, 2022 मध्ये गनिमी कावा दाखवला आणि 2024 मध्ये महाराष्ट्रात पूर्ण बहुमताचे सरकार आणून दाखवले. यावेळी मुंबई महानगरपालिकेवरही महायुतीचा भगवा झेंडा फडकवणार महायुतीचा; महापौर बसवल्याशिवाय भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

BDD चाळीचा प्रकल्प हा संपूर्ण आशियातील सर्वात मोठा अर्बन रिन्युअल प्रकल्प आहे. अभ्युदय नगरमधील मराठी माणसाला हक्काचे घर देण्याचा निर्णय आम्ही घेतला. मेट्रो प्रकल्प बाधित गिरगावकरांना गिरगावातच पुनर्वसनाच्या इमारती आम्ही बांधून दिल्या. विरोधकांनी मुंबईकरांसाठी काय केले? याचे उत्तर त्यांना जनतेला द्यावे लागेल. कोविड काळात मुंबईकरांच्या टाळूवरचे लोणी खाणारे, बॉडी बॅगमध्येही घोटाळा करणारे ‘कफनचोर’ कोणत्या तोंडाने मुंबईकरांसमोर येतील, हा माझा प्रश्न आहे.

धारावीतील 10 लाख लोकांना धारावीतच घर देणार आहोत. लवकरच मुंबईकरांसाठी एसी लोकल गाड्या आणणार आहोत. मुंबईकरांसाठी असे अनेक विकास प्रकल्प राबवत आहोत.

यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष व आमदार रविंद्र चव्हाण, भाजप मुंबई अध्यक्ष आमदार अमीत साटम, मा. केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *