दोन दिवसांत संजय शिरसाटांचा राजीनामा घ्याः

0
images - 2025-08-26T120005.003

दोन दिवसांत संजय शिरसाटांचा राजीनामा घ्याः

मुंबई दि. २६ ऑगस्ट

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी नवी मुंबईतील बिवलकर कुटुंबाला बेकायदेशीर रित्या जमीन देत हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केल्यानंतर  त्याचे बॅगभर पुरावेही सादर केले. रोहित पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणाची दखल घेण्याचे आवाहन केले, तसेच संजय शिरसाट यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली.

पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी बिवलकर कुटुंबांचा १९९३ चा अर्ज, सिडकोने फेटाळलेले आधीचे चार अर्ज, विधी व न्याय विभागाचा अहवाल, नगर विकास विभागाने १ मार्च २०२४ ला सिडकोला दिलेले पत्र, सिडकोचा ठराव आणि सिडकोचे सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र असे पुरावे माध्यमांसमोर दाखवले.

रोहित पवार म्हणाले की, बिवलकर कुटुंबाचा साडेबारा टक्क्यासाठी अर्ज २८ जुलै १९९३ आला होता. या अर्जात त्यांनी सांगितले की, आम्ही चुकीचे ठरलो, तर आम्ही पूर्ण जमीन सिडकोला देणार आहोत. तांत्रिकदृष्ट्या पाहिल्यास बिवलकर कुटुंब चुकीचेच ठरलेले आहेत. असे रोहित पवार म्हणाले.

रोहित पवार यांनी सिडकोने बिवलकरांचा अर्ज चार वेळा फेटाळल्याचे सांगितले. ते म्हणाले की, १८ एप्रिल १९९४ रोजी पहिल्यांदा अर्ज फेटाळला. त्यानंतर १९९५ आणि २०१० मध्ये आधीचे कारण देत सिडकोने बिवलकर कुटुंबाचा अर्ज फेटाळून लावला. असेही रोहित पवार यांनी सांगितले आहे.

रोहित पवार म्हणाले की, विधी व न्याय विभागाच्या अहवालानुसार, आम्ही बिवलकरांना परवानगी दिली, असे विजय सेहगल यांनी सांगितले होते. पण त्यांनी सांगितलेले चुकीचे सांगितले आहे. विधी व न्याय विभागाने अहवाल दिल्यानंतर, त्यावर सिडकोने नकारात्मक भूमिका घेत, तो अहवाल चुकीचा असल्याचे म्हटले आहे.

रोहित पवार म्हणाले की, मंत्री संजय शिरसाट यांनी सिडकोचे चेअरमन असताना हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. याबाबत पुरावे आम्ही सादर केले. त्यानंतर आमच्यावर काही लोकांनी टीका केली की महादेव यांना बुद्धी देवो. एकनाथ शिंदे यांनी टीका केली. मला शिंदे यांना सांगायचे आहे की, महादेवाने आम्हाला बुद्धी दिली आहे. तिचा वापर करून आम्ही भ्रष्टाचार बाहेर काढला आहे. आम्हाला देवेंद्र फडणवीस म्हणाले पुरावे सादर करा. आम्ही त्यांना देण्यासाठी १२ हजार पानांचे पुरावे बॅग भरून आणले आहेत. असे रोहित पवार यांनी बोलताना सांगितले.

रोहित पवार म्हणाले की, पाच हजार कोटी रुपयांची फाइल सहजपण फिरत असेल, तर याला भ्रष्टाचार म्हणू शकतो. आमचे ट्रकभर, गाडीभर नाहीत, पण बॅगभर पुरावे आहेत, एवढेच फडणवीसांना सांगायचे आहे. बारा हजार पानांचे हे पुरावे आहेत. आमच्याकडे असलेला पेनड्राइव्ह पण तुमच्यापर्यंत देतो. तुम्ही हे पुरावे पाहणार आहात का? असा सवाल करत, याबाबत फडणवीस काय करतात हे आम्हाला सगळ्यांना बघायचे आहे, असे रोहित पवार म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयात प्रकरण सुरू असताना बिवलकर यांना जमीन कशी काय दिली? असा सवाल रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला. हे कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन आहे असे वाटत नाही का? जी 5 हजार कोटी रुपयांची जमीन दिली ती जमीन बिवलकर यांनी बिल्डरांना विकली. आता ही जमीन अडचणीत येणार आहे. त्या लोकांचे पुढे काय करणार आहात? ही जमीन तुम्ही माघारी घेणार का? असे प्रश्नही रोहित पवारांनी उपस्थित केले.

संजय शिरसाटांना त्यांच्या पदावरून काढा. कारण ते सुसाट सुटले. जर तुम्हाला पैशाची गरज लागली, तर शासनाकडे या. शासनाचे पैसे संपले, तर माझी बॅग उघडी आहे, असे वक्तव्य त्यांनी कालच केले आहे. अशा भ्रष्ट्र माणसाला पदावर ठेवू नका. पुरावे आम्ही दिलेले आहेत. या सर्व प्रकरणाची शहानिशा होईपर्यंत ६१ हजार स्वेअर मीटरचा भूखंड हा ताबडतोब थांबवावा. ८ हजार स्वेअर मीटरचा भूखंड एका प्रायव्हेट व्यक्तीला दिलेला आहे. तो सुद्धा परत मागून घ्यावा. संजय शिरसाट यांचा दोन दिवसांत राजीनामा घ्यावा, अशी मागणी रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली. गणपती होईपर्यंत आम्ही शांत राहू, असा इशाराही रोहित पवार यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *