गणपतीसाठी कोकणात जाणा-या ५१०३ बस फुल्ल.
गणपतीसाठी कोकणात जाणा-या ५१०३ बस फुल्ल.
मुंबई, दि. २३ ऑगस्ट;
येत्या २७ ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबई, ठाणे व पालघर विभागातून कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या कोकणवासीयांची पहिली पसंती ST ला दिली आहे. त्यामुळे एसटीच्या ४४७९ बसेस गट आरक्षणासह एकूण ५१०३ जादा बसेस आतापर्यंत फुल्ल झालेले आहेत. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
मंत्री सरनाईक म्हणाले की, मुंबईतील कोणवासीयांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी st महामंडळाने यंदा २३ ऑगस्ट ते ०७ सप्टेंबर दरम्यान ५२०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्के तिकिट दरात सवलत दिली जात आहे. २३ ऑगस्ट पासून मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
गणपती बाप्पा , मुंबईचे कोकणवासीय व एसटी यांचे एक अतुट नाते आहे. मुंबईतुन कोकणात थेट आपल्या गावी अगदी वाडी-वस्ती पर्यंत फक्त एसटीच कोकणवासीयांना सुखरूप पोहोचवते. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सरवासाठी कोकणात जाणाऱ्या मुंबईकर कोकणवासीयांच्या सेवेसाठी एसटी धावत असते”. असे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी केले.
गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून, २३ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या काळात एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारण्यात येणार आहेत. अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली.
