… पण मला छेडलं तर कोणाला सोडत नाही!
… पण मला छेडलं तर कोणाला सोडत नाही!
मुंबई, दि १९ जुलै २०२५ ;
बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेला मी प्रामाणिक कार्यकर्ता आहे, मी कोणाला छेडत नाही, पण मला छेडलं तर कोणाला सोडत नाही, असा निर्वाणीचा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठा गटाला दिला.
विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. भरलेल्या ताटाचे विचारता पण जनतेच्या मतांची माती कोणी केली, देवेंद्र फडणवीस यांच्या पाठित खंजीर कोणी खुपसला, असे प्रतिप्रश्न शिंदे यांनी यावेळी उबाठाला केले.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मराठी माणूस मराठी भाषा आमचा श्वास आहे आणि हिंदुत्व आमचा प्राण आहे. पालिका निवडणुका जवळ आल्या की मराठीबद्दल, महाराष्ट्राबद्दल आणि मुंबईबद्दल जो काही अपप्रचार होतो तो सगळ्यांना अवगत झालाय. वरुन किर्तन आणि आतून तमाशा, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठाला लगावला. मराठीचं प्रेम आम्हाला शिकवण्याची गरज नाही. जन्मलो मराठी, मराठीसाठीच जगणार आणि मराठीसाठीच खपणार, असे ते म्हणाले.
मराठी माणूस तुमच्या फेक नरेटिव्हला आता फसणार नाही. कारण तुमच्या तोंडी ‘म’ म्हणजे महापालिकेचा, ‘म’ मलिद्याचा, ‘म’ मतलबाचा आणि ‘म’ मतांचा आहे आणि तुमच्या मनात फक्त मतांचे राजकारण आहे, अशी खरमरीत टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठावर केली. माझ्याकडे बोलण्यासारखं खूप काही आहे, पण जेव्हा ते बोलतात तेव्हा मी बोलतो. आरोपांना आरोपाने नाही तर कामातून उत्तर देणारा कार्यकर्ता आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. फेसबुकवाले सामोरे जाऊ शकत नाही म्हणून सकाळ दुपार व संध्याकाळ माझ्यावर टीका करतात. माझ्यावर टीका करण्यापूर्वी तुमच्याकडे तीन बोटं आहेत त्याचा विचार करा, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठाला सुनावले.
इतक्या लवकर झटपट रंग बदलणारा सरडा महाराष्ट्राने पाहिला नाही. ज्यांना कस्पटासमान समजले, संपलेले लोक असल्याचे हिणवले त्यांच्याच मागे रोज जावे लागतंय, चल मेरे भाई तेरे हाथ जोडतां हू, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला. भरलेल्या ताटाचे विचारता पण निकालानंतर जनतेच्या मतांची माती कोणी केली, असा सवाल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विचारला. २०१९ च्या निवडणूक निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ५० फोन केले ते का नाही उचलले. गुवाहाटीला असताना तुम्ही दिल्लीशी संधान बांधण्याचा प्रयत्न करत होतात. आम्ही सत्ता सोडून गेलो. गद्दारी तुम्ही केली, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
