Ads

---

आनंदराज आंबेडकरांच्या सेनेची शिंदेसेनेशी युती.

By Xtralarge News

July 17, 2025 12:39 pm

Ads

आनंदराज आंबेडकरांच्या सेनेची शिंदेसेनेशी युती.

मुंबई, ता. १६ जुलै २०२५:

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन सेना या दोन पक्षांनी युती केली आहे.

यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, शिवसेना आमदार दिपक केसरकर, आमदार दिलीप लांडे, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, सहमुख्य प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले की, शिवसेना आणि रिपब्लिकन सेना या दोन्ही सेना आहेत. रस्त्यावर अन्यायाविरोधांत लढणाऱ्या सेना आहेत. एक बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणारी सेना आणि दुसरी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रक्ताचा वारसा घेऊन चालणारी सेना आहे. मुख्यमंत्री असताना कॉमन मॅन म्हणून काम केलं आता डीसीएम अर्थात डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणून काम करतोय.

सर्वसामान्य माणूस, कार्यकर्ता हीच आपली सामाजिक बांधिलकी आहे. तळागाळातील माणसाची नाळ तुटता कामा नये, हे आजवर पथ्य पाळले. बाबासाहेबांच्या संविधानामुळेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला. सर्वसामान्य कुटुंबातून आलेले नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. संविधान सर्वोच्च असून त्यात सर्वसामान्य घटकाला न्याय मिळाला पाहिजे, तो मुख्य प्रवाहात आला पाहिजे. बाबासाहेबांचे संविधान आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय, असे ते म्हणाले.

रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर म्हणाले की, शिवसेना रिपब्लिकन सेनेच्या युतीमुळे राज्यात सामाजिक आणि राजकीय बदल घडून येतील. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना वर्षा निवासस्थानी पहिल्यांदाच वर्षावास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ते आंबेडकरी कार्यकर्त्यांना सत्तेत सामावून घेतील, असा विश्वास आनंदराज आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केला.

 

No comments to show.

Leave a Comment