आषाढी वारीचे योग्य नियोजन कसे केले?
आषाढी वारीचे योग्य नियोजन कसे केले?
सोलापूर, दि. ११ जुलै २०२५;
आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक परंपरेचा एक अविभाज्य भाग असून ती केवळ एक धार्मिक यात्रा नसून सामाजिक सलोखा, शिस्त आणि एकात्मतेचे मूर्त स्वरूप आहे. या महत्त्वपूर्ण वारीचे यशस्वी आयोजन हे केवळ श्रद्धाळूंच्या सहभागावर नाही, तर प्रशासनाच्या सुसूत्र आणि सजग नियोजनावरही अवलंबून असते. दिनांक 6 जुलै 2025 रोजी पार पडलेल्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर, 26 जून ते 10 जुलै 2025 या कालावधीत झालेल्या वारीचे नियोजन हे सोलापूर जिल्हाधिकारी श्री. कुमार आशीर्वाद यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखालील काटेकोर नियोजन व धाडसी निर्णयामुळे ही वारी अधिक सुसंगत, सुरक्षित आणि शिस्तबद्ध होऊन यशस्वी झाली.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या नेतृत्वाखाली आषाढी वारी 2024 ही यशस्वी झाली होती. या वारीत स्वच्छतेला अधिक प्राधान्य देऊन त्याचे काटेकोरपणे अंमलबजावणी झाल्याने वारकरी, भाविक यांना चांगल्या सुविधा मिळाल्या होत्या. परंतु मागील वर्षीच्या वारीच्या अनुभवावर पालखी, दिंडया, पालखी महामार्ग, वाखरी पालखी तळ, 65 एकर व पंढरपूर शहर या ठिकाणी देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांमध्ये सुधारणा करणे आवश्यक वाटल्याने जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी आषाढी वारी 2025 मध्ये त्या अनुषंगाने नियोजनबद्ध निर्णय घेऊन त्या निर्णयाची प्रत्यक्ष अमलबजावणी केली व ती अंमलबजावणी व्यवस्थितपणे होत आहे की नाही याची खात्रीही स्वतः फिल्डवर जाऊन केली. यावेळी गर्दीच्या ठिकाणी जाताना भाविकांना त्रास होऊ नये यासाठी त्यांनी पायी जाणे, बाईकवर जाऊन देखरेख व नियंत्रण ठेवले. त्यामुळे वारकरी, भाविक यांना अधिक चांगल्या व वेळेत सुविधा देण्याची व्यवस्था अधिक तत्परतेने झाली.

उजनी धरणातील पाण्याचे नियोजन –
यावर्षी पावसाचे प्रमाण खूप अधिक असल्याने तसेच उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने उजनी धरणात उपयुक्त पानासाठी जवळपास 73% झाला होता व भीमा नदीत पाणी सोडले जात होते. त्यामुळे पंढरपूर येथे चंद्रभागा नदीला पूर परिस्थिती निर्माण होऊन संपूर्ण वाळवंट पाण्याखाली गेलेले होते. तसेच नीरा नदीचे पाणी व उजनी धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करून चंद्रभागा नदी पात्रात पाणी आवश्यक त्या प्रमाणातच राहील यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद स्वतः लक्ष घालून या पाण्याचे नियंत्रण व नियोजन करत होते. त्यासाठी जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्कात राहून उजनी धरणातील सोडण्यात येणारे पाणी कमी करून यात्रा कालावधीत चंद्रभागा नदीचे वाळवंट भाविकांसाठी रिकामे राहील याची दक्षता त्यांनी घेतली.
VIP दर्शन बंद –

श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पद दर्शनासाठी वारकरी सर्वसामान्य भाविक मोठ्या प्रमाणावर दर्शन रांगेत किमान 15- 16 तास उभे राहतात. तसेच व्हीआयपी दर्शनामुळे हा कालावधी अधिक वाढू शकतो याचा अनुभव मागील वारी कालावधीत आलेला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा खूप मोठा व धाडसी निर्णय सर्वसामान्य भाविकांसाठी घेतला. व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेणारे ते पहिलेच जिल्हाधिकारी ठरले. या निर्णयामुळे भाविकांमध्ये आनंदी वातावरण झाले तसेच पदस्पर्श दर्शनाचा कालावधी किमान पाच ते सहा तासांनी कमीही झाला. त्यामुळे दर्शन रांगेत उभा राहणाऱ्या लाखो भाविकांना याचा फायदा झाला. या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले. जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी हा निर्णय सर्वसामान्य वारकरी भाविक यांचे दर्शन लवकर व्हावे व त्यांना दर्शन रांगेत जास्त वेळ उभा राहावे लागू नये यासाठी कोणालाही न विचारता स्वतःच्या अधिकारात घेतला. मागील पन्नास वर्षापासून व्हीआयपी दर्शन बंद करण्याबाबतची फक्त चर्चा होत राहिली, परंतु जिल्हाधिकारी यांनी हा निर्णय घेऊन वारकऱ्यांचे व सर्वसामान्य भाविकांचे दर्शनाची वेळ खूप कमी केली, त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत असले तरी त्यांना या निर्णयाचा अप्रत्यक्षपणे त्रास ही झाला.

नो व्हेईकल झोन –
अति महत्त्वाच्या व्यक्तींची वाहने थेट मंदिरापर्यंत येत होती. त्यामुळे सर्वसामान्य भाविक वारकऱ्यांना खूप त्रास होत होता. तसेच चौपाळ ते मंदिर या रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने अनुचित घटना घड नेची शक्यताही नाकारता येत नव्हती. त्यामुळे चौपाळ ते मंदिर हा रस्ता नो व्हेइकल झोन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काढले. त्यामुळे मंदिर प्रदक्षिणा तसेच दर्शन घेऊन बाहेर पडणाऱ्या भाविकांना याचा फायदा झाला तसेच पोलीस प्रशासनावरील ताण ही कमी झाला. या निर्णयाचे वारकरी संप्रदाय व सर्व सामान्य नागरिकांनी कौतुक केले. परंतु याही धाडसी निर्णया बाबत त्यांना त्रास झाला.
नामदेव पायरी ते चौपाळ रस्ता भाविकांसाठी वन वे :-

आषाढी वारीत नामदेव पायरी तसेच श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी मंदिर परिसरात खूप मोठी गर्दी भाविक करतात. चौपाळ ते मंदिर पर्यंत नवे कल झोन केले तरी मंदिर प्रदक्षिणा करणाऱ्या भाविकांची संख्या खूप मोठी असते. मंदिरातून दर्शन घेऊन जाणारे भाविक ही बाहेर पडतात. त्यामुळे येथे वारकऱ्यांची भाविकांची लाखोंची संख्या असते. त्यामुळे या ठिकाणी चेंगरा चेंगरी होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे नामदेव पायरी ते चौपाळ हा रस्ता पायी चालत जाणाऱ्या भाविकांसाठीही वनवे करण्यात आला. त्यामुळे पोलीस विभागाला गर्दीवर योग्य नियंत्रण ठेवणे शक्य झाले व यातून कोणत्याही प्रकारची अनुचित घटना होण्यापासून प्रशासनाला यश मिळाले.
आषाढी साठी भाविकांचे गर्दीचे रेकॉर्ड –

आषाढी वारी 2025 मध्ये प्रशासनाने अनुमान लावल्याप्रमाणे 20 ते 22 लाख वारकरी पंढरपूर मध्ये दाखल झालेले होते. कारण यावर्षी पाऊस वेळेपूर्वी झालेला होता व शेतकरी वर्गांच्या बहुतांश पेरण्या ही पूर्ण झालेल्या होत्या त्यामुळे वारीला मोठी गर्दी होईल याची अपेक्षा प्रशासनाने केलेली होती व त्यानुसारच नियोजन ही केलेले होते. विठ्ठल रुक्मिणीच्या पददर्शनाची रांग गोपाळपुराच्या पुढे गेलेली होती. ही रांग आणखी खूप पुढे जाण्याची शक्यता होती. एक तर पंढरपूर मध्ये आलेल्या भाविकांना दर्शन रांगेत पोहोचण्यासाठी सात आठ किलोमीटर प्रवास करावा लागत होता. त्यामुळे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पुढाकार घेऊन गोपाळपूरच्या जवळ हॉटेल आसरा समोर एक जर्मन हंगर टेन्ट व तिथून सातशे मीटर अंतरावर एका शेतकऱ्याच्या शेतात दुसरा जर्मन हंगर टेन्ट रातोरात उभा करून घेतला.
पहिल्या टेन्ट मध्ये दीड किलोमीटरची रांग तर दुसऱ्या टेन्ट मध्ये अडीच किलोमीटरची दर्शन रांग अड्जस्ट करण्यात आली. तसेच दर्शन रांगेत देण्यात येणाऱ्या सर्व सोयी सुविधा त्यांच्या बाहेर एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्या तसेच पोलिसांनाही या ठिकाणी नियंत्रण ठेवणे शक्य झाले. व भाविकांनाही याचा खूप मोठा लाभ झाला. जवळपास चार किलोमीटरच्या दर्शन रांगेचे टेंटच्या माध्यमातून व्यवस्थापन करण्यात जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
पंढरपूर शहरातील अतिक्रमणे काढली –
आषाढी वारी 2025 च्या अनुषंगाने पंढरपूर शहरात श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी वीस लाखापेक्षा अधिक भाविक येण्याची शक्यता प्रशासनाने गृहीत धरली होती त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपूर शहरातील सर्व रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याबाबत उपविभागीय अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी व पंढरपूर नगरपरिषद यांना निर्देश देणे दिले होते त्या अनुषंगाने शहरातील सर्व अतिक्रमणे काढून रस्ते मोकळे व प्रशस्त करण्यात आले होते त्यामुळे भाविकांना अतिक्रमणाचा कोणताही त्रास होणार नाही व गर्दीवर नियंत्रणासाठी ही हा निर्णय महत्वपूर्ण ठरला. तसेच पालखी मार्ग पालखीतळ या ठिकाणी झालेली ही अतिक्रमणे काढून टाकण्यात आली तसेच पंढरपूर शहर व पालखी मार्गावर अवैध होर्डिंग काढून घेण्यात आले. तसेच असे होर्डिंग्स पुन्हा कोणी उभे केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
पालखी तळ सुविधा –
श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या मार्गावरील पालखी तळ तसेच विसावा ठिकाणी पावसामुळे चिखल होऊ नये यासाठी मागील वर्षीच्या अडीच पट मुरमीकरण करण्यात आले. तसेच तळा वरून शौचालयास जाण्यासाठी ही रस्त्यावर मुरमीकरण करण्यात आले. तसेच पालखीतळावर 94 वॉटरप्रूफ तर 11 जर्मन हँगर मंडप उभारण्यात आले. यातून 7 लाख 85 हजार चौरस फूट जागा उपलब्ध झाली जी मागील वर्षी तीन लाख 12 हजार चौरस फुटाचे वॉटरप्रूफ मंडप टाकण्यात आलेले होते, मागील वर्षीच्या अडीच पट जास्त वॉटरप्रूफ मंडप टाकण्यात आलेले होते. संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोबत पाच मोबाईल चार्जिंग व्हॅन देण्यात आलेल्या होत्या. तसेच पालखी मार्गावर विष ठिकाणी बीएसएनएलच्या मदतीने टेलिफोन स्टॅन्ड उभारण्यात आले होते याद्वारे वारकरी आपल्या नातेवाईकाच्या संपर्कात राहू शकत होते.
स्वच्छता –
मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी आषाढी वारीत स्वच्छतेला खूप मोठे प्राधान्य देण्यात आलेले होते. मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेऊन यावर्षी ॲडव्हान्स मोबाईल टॉयलेट सिस्टीम उभी केलेली होती. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी साठी 3600 मोबाईल टॉयलेट तर जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसाठी 2400 मोबाईल टॉयलेट पुरवठा करण्यात आला होता. हे सर्व टॉयलेट सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत व सर्व पालखीतळावर पोहोचवण्यासाठी मोबाईल टॉयलेट सिस्टीम चा वापर करण्यात आला. यासाठी एका उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करून त्याच्या अधिनस्त अधिकारी कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्यात आला होता. पालखी तळावर मुक्कामाला येण्यापूर्वीच मोबाईल टॉयलेटची व्यवस्था तसेच त्यासाठी आवश्यक असलेला पाणीपुरवठा व सफाई कर्मचारी यांची उपलब्धता केली जात होती, त्यामुळे कोठेही अस्वच्छता निर्माण झालेली नाही.
पालखी मार्ग, पंढरपूर शहर, वाखरी तळ तसेच 65 एकर या भागात मोबाईल टॉयलेट वारकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आलेले होते. या टॉयलेटची वेळोवेळी स्वच्छता करण्यासाठी सफाई कर्मचारी, पाण्याची व्यवस्था उपलब्ध केलेली होती. तसेच वारी कालावधीत पालखी मार्ग पंढरपूर शहरात कोणत्याही प्रकारची अस्वच्छता निर्माण होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्वतः पुढाकार घेऊन सफाई कर्मचाऱ्यांचे सुपरवायझर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी व पंचायत समितीचे बिडीओ त्यांच्या तीन ते चार बैठका घेतल्या. यात त्यांना त्या त्या भागातील शौचालयाचे नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. या माध्यमातून सुपरवायझर वर खूप मोठे नियंत्रण निर्माण करून त्याच्या मार्फत सफाई कर्मचाऱ्याकडून टॉयलेटची स्वच्छता राबवली गेली.
जर कोठेही अस्वच्छता राहिली तर संबंधित भागाचे सुपरवायझरवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आलेले होते. त्यामुळे सुपरवायझर यांनी संबंधित सफाई कर्मचारी यांच्याकडून टॉयलेटची स्वच्छता उत्तम प्रकारे करून घेतली. व संपूर्ण पंढरपूर शहर तसेच पालखी मार्गावर खूप चांगली स्वच्छता राहिली, यात जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केलेले सूक्ष्म नियोजन खूप महत्वपूर्ण ठरले.
