गोपाळकाल्याने आषाढी यात्रेची सांगता..

0
FB_IMG_1752158667194

गोपाळकाल्याने आषाढी यात्रेची सांगता..

पंढरपूर,दि. १० जुलै २०२५:-

गोपाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड केला या जयघोषात अवघी श्रीकृष्णनगरी म्हणजेच गोपाळपूरनगरी लाखो वारकऱ्यांच्या गजराने दुमदुमून गेली. ज्ञानेश्वर माऊली तुकारामाच्या गजरात गोपाळपूरात मानाच्या पालख्यांसह सर्व संताच्या पालख्या दाखल झाल्या आणि गोपाळकाला केल्यानंतर विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी विठ्ठल मंदीरात आल्या. मानाच्या पालख्याने विठ्ठलाचे दर्शन घेतले आणि परतीचा प्रवास सुरु केला.

पोर्णिमेच्या दिवशी परंपरेनुसार गोपाळपूर येथे मानाची अंमळनेरकर महाराजांची दिंडी काल्याच्या उत्सवासाठी पहाटे 5.00 वाजता भगवान श्रीकृष्ण मंदिरात दाखल झाली, त्यानंतर भजन झाले. तर शेगावच्या श्री संत गजानन महाराज पालखीचे पहाटे 4.00 वाजता गोपाळपूरात आगमन झाले. पहाटेपासूनच एकामागोमाग एक अशा विविध सुमारे 450 संतांच्या दिंड्या, पालख्या विठ्ठलनामाचा गजर करीत गोपाळपुरात दाखल झाल्या होत्या.

सकाळी 9.00 च्या सुमारास जगदगुरु संत तुकाराम महाराजांची तर 10.00 च्या सुमारास संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे पालखी सोहळे गोपाळपुरात दाखल झाले. ज्ञानेश्वर महाराजांच्या तसेच तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. मंदिराजवळ पालख्या विसावल्या होत्या. या पालख्यासह संत सोपानकाका, संत मुक्ताबाई, संत नामदेव महाराज, संत गोरोबा, संत एकनाथ महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत निळोबाराय, चांगावटेश्वर देवस्थान यांच्यासह अन्य संतांच्या पालख्यांचे व दिड्यांचे गोपाळपुरात आगमन झाले.

गोपाळपुर येथील श्रीकृष्ण मंदीरात पहाटे 2.30 वाजता विश्वस्तांच्या हस्ते पूजा करण्यात आली. पूजा झाल्यानंतर पहाटे 3.30 वाजता श्रीकृष्ण मंदीर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. भाविकांनी मोठ्या श्रध्देने गोपाळकृष्णाचे दर्शन घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घातली तसेच एकमेकांना प्रेमाने लाह्यांचा काला भरवून गळाभेट घेतली. श्रीकृष्ण मंदिर समितीच्या वतीने प्रसाद म्हणून लाह्यांच्या काल्याचे वाटप करण्यात आले.

संत-देव भेटीचा सोहळा…

गोपाळकाला झाल्यानंतर सर्व मानाच्या पालख्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दाखल झाल्या व सर्व संताच्या पादुका विठ्ठल दर्शनासाठी नेण्यात आल्या.यावेळी देवाची आणि संताची अनुपम भेट घडवून आणण्यात आली. विठ्ठल- रुक्म‍िणी मातेचे दर्शन घेतल्यावर हा संतदेव भेटीचा सोहळा पार पडला. यानंतर पालख्या परतीच्या मार्गावर रवाना झाल्या.

जातो माघारी पंढरीनाथा। तुझे दर्शन झाले आता ।। म्हणत जड अंत:करणाने संताच्या पालख्यांनी व वारकऱ्यांनी परतीचा प्रवास सुरु केला.

बुधवारी प्रक्षाळपूजा..

पंढरपूर येथील आषाढी यात्रेत भाविकांना दर्शन देण्यासाठी विठ्ठल- रुक्मिणी अहोरात्र उभे असतात.या कालावधीत देवाचे नित्योपचार बंद असतात. विठ्ठलाचे नवरात्र असल्याने पलंग काढण्यात आलेला असतो. त्यामुळे बुधवारी श्रींची प्रक्षाळ पूजा करण्यात येणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *