मंत्री पंकजा मुंडेंनी वाटल्या कापडी पिशव्या !
मंत्री पंकजा मुंडेंनी वाटल्या कापडी पिशव्या !
मुंबई, दि. ५ जून २५ : –
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात आयोजित विशेष कार्यक्रमात मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एकल प्लास्टिकचा त्याग करून कापडी पिशव्या वापरण्याचा संकल्प केला. मंत्रालयातील प्रत्येक विभाग एकल प्लास्टिक मुक्त झाले पाहिजे असा प्रयत्न आहे. त्यासाठी मंत्रालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी केले.
पर्यावरणाचे महत्त्व ओळखून त्याचे संवर्धन करण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात यासाठी मंत्रालयात पहिल्यांदाच अशा प्रकारचा एकल वापर प्लास्टिक निर्मूलन करण्याचा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज, पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव एन रामस्वामी, अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल आदी उपस्थित होते.
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी उत्स्फूर्तपणे तयार केलेली वापरातील एकल प्लास्टिकचा वापर टाळण्याची शपथ मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी यांना दिली. पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांना कापडी पिशव्यांचे यावेळी वाटप करण्यात आले.
मुंडे म्हणाल्या की, पर्यावरणाचे संवर्धन हा एक महत्त्वाकांक्षी विषय असून आपण सर्वांनीच पर्यावरणाच्या संवर्धनाची आवड जोपासणे आवश्यक आहे. शासकीय व खाजगी कार्यालयात सर्व कामकाजात कागद मोठ्या प्रमाणात वापरला जातो, म्हणून पर्यावरण संवर्धनासाठी आपण सर्वप्रथम मंत्रालयातील कामकाज कागद विरहित करून आपले पहिले पाऊल उचलूयात. पर्यावरणाबद्दलची ही जनजागृती आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रभर पसरवायची आहे. इतरांना जागृत करण्यासाठी आपण सर्वप्रथम आपण जागरूक राहायला हवे. पेपर व प्लास्टिकचा वापर टाळायला हवा. प्लास्टिकच्या पिशवी ऐवजी कापडी पिशवी वापरात आणावी. प्लास्टिकला नो व पर्यावरणाला हो म्हणून आज पासून पर्यावरण संवर्धनाची शपथ घेण्याचे आवाहन मंत्री मुंडे यांनी केले.
